सत्यशोधक समाजाने मानवी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला..प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादनप्रेस मीडिया लाईव्ह :

कुरुंदवाड ता. २४ सध्याच्या असत्याच्या बोलबाल्याच्या आणि निवडकांच्या व्यक्तिगत उन्नती साधण्याच्या काळामध्ये महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाजाचा विचार अनेक अर्थानी महत्त्वाचा आहे.सत्य ,समता ,समानहक्क,स्वावलंबन,समानसंधी ,बुद्धिवाद , मानवी मूल्ये, सामाजिक न्याय यासारखी महत्त्वाची मूल्ये सत्यशोधक समाजाने आग्रहाने प्रतिपादली होती.आणि ती रुजविण्याचा प्रयत्न केला.आज व्यक्तीची प्रतिष्ठा आणि समाजाची एकता अग्रक्रमावर आणण्या ऐवजी धर्मांधता व कर्मकांडयुक्त व्यवहार यामध्ये पुन्हा एकदा बहुजनांना अडकवले जात आहे. त्या दास्य शृंखला तोडायच्या असतील सत्यशोधक समाजाचा विचार महत्वाचा ठरतो असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते शतकोत्तर नगर वाचनालय ( कुरुंदवाड ) च्या वतीने आयोजित पद्मश्री पां. वा. गाडगीळ आणि डॉ. स.रा.गाडगीळ स्मृती शरद व्याख्यानमालेत बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा विनयाताई रमेश घोरपडे होत्या.स्वागत प्रा. माणिक दातार यांनी केले.कार्याध्यक्ष अ.शा.दानवाडे यांनी प्रास्ताविक केले. उपकार्याध्यक्ष प्रा.बी.डी.सावगावे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.


प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,सत्य व मूलभूत विचार समाजात रुजायला वेळ लागतो.कोणताही विचार आम समाजामध्ये व्यापक स्वरूपात स्वीकारला गेला नाही याचा अर्थ तो विचार महत्त्वाचा नसतो असे नाही. तर त्या विचाराचे प्रबोधन करण्यात आणि अंगीकार करण्यात आपण कमी पडत असतो. समाजामध्ये परंपरावाद आणि रूढीप्रियता यामुळे अनेकदा संत विचारांचाही पराभव झाल्यासारखे दिसत असते हे खरे आहे. समाज तात्विक दृष्ट्या मागे पडतो त्यावेळी

सुधारणावादी चळवळ समाजात गतिमान करत असतो यात शंका नाही.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापनेतून हेच केले.

सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी सत्याचा प्रसार आणि सद्विचार लोकांमध्ये रुजवण्याचे काम करावे. मानवी हक्क आणि कर्तव्यांचा त्यांनी आपल्या लेखनातून व भाषणातून प्रचार व प्रसार करावा हे अभिप्रेत होते. अनिष्ट चालीरीतींचे निर्मूलन करणे हे समाजाच्या उद्देशातील मुख्य कलम होते. तसेच महात्मा ज्योतिराव फुले, तुकाराम तात्या पडवळ, दादोबा पांडुरंग आदींची पुस्तके समाजाची विचारधारा म्हणून उपयोगात आणावीत असेही ठरवण्यात आले. प्रस्थापित धर्मग्रंथातील विषमतेवर व पक्षपातावर ज्योतिरावांना आसूड ओढायचे होते. सत्य काय आहे ? ते लोकांसमोर मांडायचे होते. म्हणूनच त्यांनी ‘ सत्यशोधक ‘ हे नाव धारण केले. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सत्यशोधक समाजाच्या स्थापने मागील प्रेरणा, त्याची वाटचाल आणि त्याचे समकालीन महत्त्व याचे विश्लेषण केले.भूपाल दिवटे गुरुजी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post