कोल्हापूर जिल्ह्यात 475 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषितप्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर जिल्ह्यात 475 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबरपासून रणधुमाळी सुरु झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना या बुळचट शब्दाखाली नेत्यांची मनमानी आणि त्यांचा धूर्त राजकीय डाव साधण्याचा प्रकार नवीन नाही. किंबहुना तो अंगवळणी पडला आहे. मात्र, याला छेद देणारी आणि चांगल्या माणसांचे राजकारण नव्हे म्हणणाऱ्यांना सुद्धा चपराक बसावी, अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील म्हाळूंगे या छोट्या गावात घडली आहे. या घटनेनंतर जिल्हाभर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

म्हाळूंगे  गावच्या मावळत्या ग्रामपंचायतीमध्ये पार्वती चौगले या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. यानंतर मिळालेल्या संधीचा त्यांनी विधायक कामासाठी करताना म्हाळूंगे गावचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे या कामगिरीच्या जोरावर त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सहज संधी होती. मात्र, पार्वती चौगले यांचे चिरंजीव प्रकाश चौगले यांनी नम्रपणे निवडणूक लढवण्यास नकार दिला. सरपंचपद खुल्या गटात आरक्षित झाल्याने गावातील अन्य कोणाला, तरी संधी मिळावी म्हणून त्यांनी निवडणूकल न लढवण्याचा निर्णय घेतला.प्रकाश चौगले यांचा कोल्हापूर शहरात पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते व्यवसायानिमित्त रुईकर काॅलनीत वास्तव्यास आहेत. प्रकाश चौगले यांनी घेतलेल्या निर्णयाने गावातील महिला वर्गामध्येच चांगलीच नाराजी पसरली. गावातील महिलांनी थेट रुईकर काॅ लनी गाठत प्रकाश चौगले तुम्ही सरपंच व्हा म्हणून घराला घेराव घालत ठिय्या मांडला. जोवर आपण अर्ज दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अन्न पाणीही घेणार नाही, अशीच भूमिका गावकरी महिलांनी घेतली. त्यामुळे महिलांच्या भावनेच्या तसेच ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेचा आदर करत त्यांनी आपला निर्णय बदलला.

दरम्यान, जिल्ह्यातील475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळीसुरु झाली आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांत मुदत संपलेल्या गावांमध्ये निवडणुका होत असून तहसीलदारांकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध झाली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे गावागावांतील वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल केले जातील. 5 डिसेंबरला अर्ज छाननी होईल. 7 डिसेंबरला चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. 18 डिसेंबरला मतदान व 20 डिंसेबरला मतमोजणी होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post