पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार संजयसिंह यांची शुक्रवारी पुण्यात जनसभा



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आम् आदमी पक्ष पुण्यात पूर्णपणे सक्रियरीत्या काम करत आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने पक्षबांधणीचे तसेच जनतेत जाऊन पुणेकरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपच्या वतीने करण्यात येत आहे. दिनांक २ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिरात केजरीवाल सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षाने बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यकर्ता मेळावा घेत पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्याचाच पुढील भाग म्हणून येत्या *शुक्रवारी दिनांक १६ सप्टेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्यसभेतील गटनेते खासदार संजयसिंह यांची गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ४.३० वाजता जाहीर सभा होणार आहे.*

नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी "मेक इंडिया नंबर वन मिशन"ची सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वांना आरोग्यसेवा, सर्वांना शिक्षण, बेरोजगारांना रोजगार, महिलांना समानता व सुरक्षिततेची हमी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव या पाच राष्ट्रीय उद्दिष्टांचा समावेश आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये करण्यात आला आहे. शुक्रवारच्या सभेमध्ये खासदार संजय सिंह हे आम आदमी पक्षाच्या नवीन राष्ट्रीय धोरणाबाबत विस्ताराने बोलणार आहेत. तसेच काँग्रेसचा 'परिवारवाद', भाजपचा 'दोस्तवाद' याला पर्याय म्हणून आम आदमी पक्षाचा 'भारतवाद' कसा असणार आहे याचीही मांडणी ते करणार आहेत. सदर सभेत महाराष्ट्र आणि विशेषतः पुणेकरांच्या समस्यांचा ऊहापोह करण्यात येईल. आपचे मिशन पुणे महानगरपालिका काय असणार आहे याचीही मांडणी होणार आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन, निवडणूक प्रभारी महादेव नाईक, राज्य प्रभारी दीपक सिंघला, प्रदेशअध्यक्ष रंगा राचुरे, राज्य समितीतील पदाधिकारी, जिल्हा व शहर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

"पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती केवळ आम आदमी पक्षाकडे आहे. आम आदमी पक्षाने सत्ता मिळाल्यानंतर दिल्ली बदलून दाखवली. आता पंजाब मध्ये देखील बदल होत आहेत. महाराष्ट्र व पुण्यामध्ये देखील हे बदल शक्य आहेत. या परिवर्तनासाठी आम आदमी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेने या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.", असे आवाहन आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेत डॉ अभिजीत मोरे, कनिष्क जाधव, सुजित अगरवाल, किशोर मुजुमदार हे उपस्थित होते. 




Post a Comment

Previous Post Next Post