पिंपरी येथील एका मुलाचे अपहरण करुन खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीसप्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी येथील एका मुलाचे अपहरण करुन खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आदित्य गजानन ओगले (वय 7) असे अपहरण आणि खून झालेल्या मुलाचे नाव आहे.याप्रकरणी गजानन श्रीकांत ओगले (वय 49, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंथन किरण भोसले (वय 20, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी), अनिकेत श्रीकृष्ण समदर (वय 21, रा. घरकुल, निगडी) यांना अटक करण्यात आली आहे.

अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. आदित्य गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका आरोपींने आत्या बोलवत आहे, असे सांगून त्या मुलाला कारमध्ये अपहरण केले. गाडीत बसलेल्या दुसऱ्या ओळखीच्या आरोपीला पाहताच आदित्यने पळून जायचा आणि आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी मंथनने त्याला गाडीत खेचून त्याचे तोंड दाबून त्याचा खून केला आणि मृतदेह भोसरीतील एका बंद कंपनीच्या टेरेसवर नेऊन टाकला.

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेची 10 पथके आदित्यचा शोध घेऊ लागली. दरम्यान आदित्यच्या वडिलांना मध्यरात्री एका व्हाट्‌सअपवरून खंडणीचा मेसेज आला. आम्ही दोन दिवसांनी पुन्हा संपर्क करू, तोपर्यंत 20 कोटी रुपये तयार ठेव, असे त्यात म्हटले होते. आरोपी मंथन हा फिर्यादी यांच्याच सोसायटीमध्ये राहत होता. तो सध्या अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे आणि फिर्यादी यांचे यापूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून तसेच पैशांसाठी आदित्यच्या अपहरणाचा डाव रचला होता. मंथन हा अनेक व्यसनांच्या आहारी गेला होता, तसेच सोसायटीतील नागरिकांसाठी तो त्रासदायक झाला होता. त्याला सहा महिने सोसायटीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात आदित्यच्या वडिलांनी पुढाकार घेतला होता. त्याचा राग मंथनच्या मनात होता.

तिसऱ्यांदा अडकला...

आरोपी मृतदेह बंद पडलेल्या कंपनीच्या टेरेसवर टाकून रस्त्यावर आले. तेवढ्यात तिथे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे बीट मार्शल आले. त्यांनी आरोपींकडे विचारणा केली असता सिगारेट पिण्यासाठी आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मंथनच्या गाडीची झडती घेतली. मात्र झडती घेण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी मृतदेह टेरेसवर टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीमधील संशयितांची चौकशी सुरू केली. मंथनची चौकशी करत असतानाच आदित्यचे वडील बेशुद्ध झाले. त्यामुळे तिथेही तो वाचला. मात्र तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर तो अडकला.

 संपर्कासाठी “कोड लॅंग्वेज’


मंथन पोलिसांसोबत आदित्याला शोधण्यासाठी मदतीचे नाटक देखील करत होता. त्यावेळी सीसीटीव्ही फूटेजमध्ये मंथनला त्याचा साथीदार दिसला. त्याने लगेच एका मोबाइल रिपेअरिंगच्या दुकानात जाऊन तिथे आलेल्या एका बिगारी कामगाराचा मोबाइल फोन अर्जंट कामासाठी म्हणून घेतला आणि त्यावरून आधी अनिकेतला संपर्कासाठी ठरलेला कोड पाठवून मग व्हॉट्‌सअप कॉल केला आणि केस, दाढी काप असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post