केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवा

 केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंग बघेल


प्रेस मीडिया लाईव्ह :

  कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचा थेट लाभ लाभार्थीना व्हावा व त्यांचे जीवन सुकर व्हावे, यासाठी या योजना लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी यंत्रणांनी अधिक सक्षमपणे काम करावे, अशा सूचना केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंग बघेल यांनी आज शाहूवाडी येथे दिल्या

  शाहूवाडी पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंग बघेल यांनी  कोल्हापूर जिल्ह्यात  राबविण्यात येत असलेल्या केंद्रीय योजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी अमित माळी,  उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

  श्री. एस.पी. सिंग बघेल म्हणाले, जिल्ह्यात केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे ही समाधानाची बाब आहे. यामध्ये आणखी अधिक चांगले काम करुन सामान्य माणसाला केंद्राच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. केंद्र सरकारच्या योजना आपल्या गावात राबविण्यासाठी लोकप्रतिनिधीनीही पुढाकार घ्यावा. सरकारच्या योजना ज्या ठिकाणी सुरु आहेत त्या ठिकाणी त्या योजनेचे फलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. सरकारच्या योजनेमधून जी कामे सुरु आहेत ती अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत. गुणवत्तापूर्ण नसणाऱ्या कामांना गावकऱ्यांनी विरोध करणे गरजेचे असून ज्या एजन्सी या कामामध्ये कुचराई करतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली  जाईल, असे ते म्हणाले.

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत सरोवर ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असून जिल्ह्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना  श्री. बघेल यांनी केल्या.  यावेळी जिल्ह्यात 75 अमृत सरोवराचे काम होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.  प्रत्येक नागरीकास आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यात यावी.  कोल्हापूर जिल्ह्याला नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा लाभलेला असून  या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील.

   बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आरोग्य,आयुष्यमान कार्ड योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना  व शिक्षण विभागाच्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला.


Post a Comment

Previous Post Next Post