संभाजीनगर मधील स्वयंसेवी संस्थांनी सेफ कॅम्पस संकल्पनेसाठी पुढे यावे : विधान परिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे

युवतींच्या सहभागाची कृती समिती स्थापन करण्याची केली सूचना 

प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजीनगर, ता. ५ : परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी नुकतीच पोलिस प्रशासन आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी बैठक घेतली आहे. त्यांना या सर्व जिल्ह्यांत शैक्षणिक संस्थांमध्ये ' सेफ कॅम्पस' ही संकल्पना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. याबाबत त्यांनीही पुढाकार घेऊन याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे सुतोवाच केले आहे. *जिल्हा आणि शहरी भागातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि या अनोख्या चळवळीस आकार द्यावा असे आवाहन आज विधानपरिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.*

आज शहरात आयोजित स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, *पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी समन्वय राखणे गरजेचे आहे. भरोसा सेल, सामाजिक सुरक्षा समिती, दक्षता समित्यांच्या माध्यमातून नियमित संवाद पोलिस यंत्रणेशी व्हावा. पीडित महिलांना समुपदेशन, सल्ला सेवा देण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. युवतींच्या पुढाकाराने शाळा महाविद्यालये परिसरात त्यांची एक नियंत्रण समिती स्थापन व्हावी. शाळा महाविद्यालये परिसरात पोलिस अधिकारी, संरक्षण अधिकारी यांचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी सर्वांना दिसतील अशा ठिकाणी लिहून तक्रार पेटी ठेवण्याबाबत आग्रही भूमिका घ्यावी. पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी बोलून ही यंत्रणा मजबूत करण्यास सहकार्य करावे. 

या बैठकीला शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा , सजग संस्थेच्या प्राचार्य मनोरमा शर्मा, आरती जोशी, ज्योती पत्की, सुरक्षा समितीच्या डॉ. रश्मी बोराटे, वकील सुवर्णा मोहिते, रेणुका घुले, शिल्पा अवचार, कविता वाघ, साथी सेवा संघाच्या किरण शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या सविता कानडे, जयश्री मढीकर, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख प्रतिभा जगताप, सुनीता आऊलवांर, सुनीता देव, अंजली मांडवकर, मंगल साळवी, स्त्री आधार केंद्राचे योगेश जाधव आदी उपस्थित होते. 



Post a Comment

Previous Post Next Post