लोकशाहीत ज्या प्रकारचे राजकारण झाले पाहिजे ते होत नाही.

  छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शोधली.....प्रवीण गायकवाड .


प्रेस मीडिया लाईव्ह :

लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला, असा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सोमवारी केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जातीवाद पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली.

प्रवीण गायकवाड यांनी सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी राज ठाकरे यांचे शिवाजी महाराजांच्या समाधी बाबतचे विधान चुकीचे असल्याचे सांगितले. सध्या महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीत ज्या प्रकारचे राजकारण झाले पाहिजे ते होत नाही. राज ठाकरे प्रचंड खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना ती शोधून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शोधली. त्यांनी त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली, असे गायकवाड म्हणाले.

छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक केले. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही पैसे जमा केले होते. परंतु १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि तो पैसा तसाच शिल्लक राहिला, असा दावा गायकवाड यांनी केला.

न. चि. केळकर आणि त्यांचे काही सहकारी यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पुतळाबाईच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचे शिल्प बसवले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार बाजूला राहिला आणि पुतळाबाईंच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचे शिल्प बसवून पुतळाबाईंचा अपमान केला, असा दावा प्रवीण गायकवाड यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post