सांगली महानगरपालिकेच्या महासभेत जोरदार राडा

 महापौरांनी मतदानाची मागणी फेटाळून लावल्याने सदस्य थेट महापौरांच्या अंगावर धावले.

प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑनलाइन महासभेचे इतिवृत्त कायम करण्यावरून सांगली महानगरपालिकेच्या महासभेत जोरदार राडा झाला. काँग्रेस-भाजपच्या नगरसेवकांनी इतिवृत्ताला विरोध करीत मतदानाची मागणी केली.मात्र, महापौरांनी मागणी फेटाळून लावल्याने सदस्य थेट महापौरांच्या अंगावर धावले. या गोंधळात महापौरांनी विषयपत्रिकेवरील 'सर्व विषय मंजूर' म्हणत सभा गुंडाळली. सभागृहाबाहेर पडताना भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांना अडविले. तर, नगरसेविकांनी राजदंड पळवीत महापौरांना घेराव घातला. मात्र, त्यांनी दुसऱ्या दाराने सभागृह सोडले. 

कोरोना मुळे तब्बल दोन वर्षांनी महापालिकेची महासभा ऑफलाइन झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. महासभेच्या विषयपत्रिकेवरील वाचन सुरू होण्याआधी भाजपच्या नगरसेविका सविता मदने यांनी महापौरांकडे औचित्याखाली (पॉइंट ऑफ ऑर्डर) इतिवृत्तावर मतदान घेण्याची मागणी केली. सभागृहात मतदानाच्या बाजूने भाजपचे 37, काँग्रेसचे 16, तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक होता. त्यामुळे महापौरांनी ही मागणी टाळण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे सदस्य संतोष पाटील यांनी मदने यांच्या मागणीला पाठिंबा देत, यावर चर्चा करण्याची मागणी केली. महापौर सूर्यवंशी यांनी हा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर आहे. त्यांचे वाचून होऊ द्या, मग त्यावर चर्चा करू, असे सदस्यांना सांगितले. विषयपत्रिकेवरील विषय सुरू होत आहेत. त्यापूर्वीच हा विषय घ्यावा, अशी मागणी मदने यांनी केली.

औचित्याच्या मुद्दय़ावर चर्चा करीत हा विषय रद्द करून पुढील सभेला मागील सभेचे सर्व विषय पुन्हा घ्यावेत किंवा हा विषय मंजूर करायचा असेल तर मतदान घ्यावे, अशी मागणी मदने यांनी केली. मात्र, महापौरांनी ती मान्य केली नाही. आधी विषय वाचून मग त्यावर चर्चा करण्याची महापौरांनी तयारी दर्शविली. यामुळे सभागृहात गोंधळ सुरू झाला. हा विषय मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे सदस्य मंगेश चव्हाण, मयूर पाटील, फिरोज पठाण आदींनी केली. याला काँग्रेस व भाजप नगरसवेकांनी विरोध केला. धीरज सूर्यवंशी, शेखर इनामदार, निरंजन आवटी, युवराज बावडेकर यांच्यासह भाजप व काँग्रेसचे नगरसेवक महापौरांसमोरील रिकाम्या जागेत धावले. डायसवर उभे राहून महापौरांना जाब विचारू लागले. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू झाला.

राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, मंगेश चव्हाण, मयूर पाटील यांनी महापौरांना सर्व विषय मंजूर करण्याची सूचना केली. महापौर सूर्यवंशी यांनी सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत, सभा संपल्याचे जाहीर केले. यानंतर काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी आणखी गोंधळ घालायला सुरुवात केली. धीरज सूर्यवंशी यांच्यासह अन्य सदस्यांनी महापौर सूर्यवंशी यांना सभागृहाबाहेर जाण्यापासून रोखले. भाजपच्या महिला नगरसेविकांनी महापौरांना घेराव घातला. यावेळी पुन्हा महापौरांच्या बचावासाठी मंगेश चव्हाण, मयूर पाटील धावले. त्यांनी भाजप नगरसेवकांच्या तावडीतून महापौरांना सोडवीत सभागृहाच्या दुसऱया प्रवेशद्वारातून सभागृहाबाहेर काढले. त्यांच्यापाठोपाठ नगरसचिव चंद्रकांत आडके व नंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी सभागृह सोडले. यामुळे संतप्त झालेल्या भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. यानंतर भाजप व काँग्रेसच्या गटनेत्यांनी महापौरांना सभागृहात बोलाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यांनी येण्यास नकार दिल्या. भाजपचे शेखर इनामदार व काँग्रेसच्या संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली 53 नगरसेवकांनी समांतर सभा घेतली. या सभेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सर्व नगरसेवकांनी निषेध केला.

विरोधकांना सभा हाणून पाडायची होती - महापौर सूर्यवंशी

'महासभेत इतिवृत्त कायम करण्याचा विषय अजेंडय़ावर होता. तरीदेखील भाजपने औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. वास्तविक अजेंडय़ावर विषय आलेला असताना, औचित्याचा मुद्दा कसा ठरू शकतो? असा सवाल मी भाजपला करीत होतो. मात्र, त्यांचे नगरसेवक ऐकण्याचा मनःस्थितीत नव्हते. तरीदेखील मी चर्चेची तयारी दर्शविली. मात्र, त्यांना सभागृहात गोंधळच घालायचा होता. सभा हाणून पाडायची होती. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्व विषय मंजूर म्हणून सांगितले. त्यानुसार रीतसर विषय मंजूर करून सभा संपविली,' अशी प्रतिक्रिया महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.

महापौरांच्या सुरक्षेला काँग्रेसचे नगरसेवक; दोन गट उघड


Post a Comment

Previous Post Next Post