पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकूल योजनेतील सदनिकांचा गैरवापरप्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकूल योजनेतील सदनिकांचा (वन बीएतके फ्लॅट) गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे . आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या योजनेत देण्यात आलेल्या अनेक सदनिका या करारभंग करून लाभार्थ्यांनी त्या भाड्याने दिल्या आहेत. काहींनी, तर त्या विकूनच टाकल्या आहेत. अशा विकलेल्या दोन सदनिकांचा लाभ रद्द करून महानगरपालिकेने त्या पुन्हा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

बाजारभावाने २५ लाख रुपयांची ही सदनिका महानगरपालिकेने फक्त साडेसात लाख रुपयांना दिली आहे. प्रथम ती पावणेचार लाख रुपयांतच देण्याची घोषणा करण्यात आली होती. पालिकेने ही योजना चिखलीत राबवली. त्याअंतर्गत तेथे १३९ इमारतीत पाच हजार ८३८ सदनिकांचा ताबा आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. या सदनिका दहा वर्षे विकता येणार नव्हत्या. तसेच भाड्यानेही देता येणार नसल्याची करारात अट आहे. मात्र, त्याचे अनेकांनी उल्लंघन केले होते. तशा तक्रारी पालिकेकडे गेल्या होत्या.

दरम्यान, घरकुल योजनेतील अटींचा भंग केला, तर म्हणजे त्यात मिळालेली सदनिका दहा वर्षाच्या आत विकली वा ती भाड्याने दिली, तर पालिकेची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी कारवाईची करारात तरतूद आहे. तसेच लाभार्थ्याने भरलेली रक्कमही पालिकेला जप्त करता येणार आहे. त्यामुळे नियमभंग केलेल्या सदनिकाधारकांची रक्कम जप्त करून त्यांच्यावर पालिका आता गुन्हे दाखल करणार का याकडे आता लक्ष लागले आहे.त्यामुळे तब्बल महिनाभर या घरकुल योजनेतील सदनिकांची पालिका पथकाने महिनाभर पाहणी केली. त्यात २९३ या भाड्याने दिल्याचे, तर ९१ मध्ये लाभार्थी नव्हे, तर त्यांचे नातेवाईक राहत असल्याचे आढळून आले. ७२१ या बंद दिसल्या. म्हणजे त्या फक्त गुंतवणूक म्हणून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तर, पाच फ्लॅट विकल्याचे दिसले. त्यांना नोटीस देण्यात आली. त्यापैकी एकाचा खुलासा पालिकेने मान्य केला. मात्र, विजय कबाडे आणि शमसुद्दीन जिलानी हे दोघे सुनावणीलाच न आल्याने त्यांचा घरकुल योजनेतील लाभ पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील  यांनी रद्द केला. त्यांच्या सदनिकांचा ताबा पालिकेने आपल्याकडे घेतला आहे. आता त्या या योजनेतील प्रतिक्षा यादीतील दोघांना दिल्या जाणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post