शहरात कचरा वाहतुकीसाठी 300 गाड्या कमी

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जिलानी (मुन्ना) शेख :

पुणे -अवघ्या काही दिवसांपूर्वी देशात स्वच्छ शहरांमध्ये पाचवा क्रमांक आणि कचरा मुक्‍त शहर म्हणून केंद्राकडून महापालिकेचा गौरव झालेला असतानाच; प्रशासनाकडून महापालिकेच्या मुख्यसभेत शहरात कचरा वाहतुकीसाठी 300 गाड्या कमी आहेत.त्यामुळे अनेक भागांत कचरा साठत असल्याची कबूलीच दिली असल्याची बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे कचरा समस्येवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले होते.
महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून कचरा वाहतूकीच्या गाड्यांसाठी सुटे भाग खरेदी करणे, आरटीओ पासिंग करणे अशा कामांसाठी 5 कोटींच्या निधीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव मुख्यसभेत ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूरीला आल्यानंतर नगरसेविका प्रिया गदादे यांनी प्रशासन कोट्यवधींचा खर्च करते, गाड्या दुरुस्त करते, नवीन गाड्याही घेते. मग आम्हाला गाड्या का मिळत नाहीत, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक चांदेरे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील यांनीबाबतची स्थिती स्पष्ट करीत लक्ष वेधले.

आयुक्‍तांचीही कबूली….
नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी या प्रकरणी खुलासा केला. महापालिकेकडे सध्या कचरा वाहतूकीच्या उपलब्ध असलेल्या गाड्या आणि समाविष्ट झालेल्या 34 गावांची हद्द पाहता. कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जवळपास 300 गाड्या कमी पडत असून त्या भाडेतत्वावर 7 वर्षांसाठी काढण्यात येणार असून सध्या ठेकेदारांकडून वाढीव गाड्या उपलब्ध करून घेण्यात आहेत.

पालिकेच्या मुख्यसभेतील निर्णय; बावधनचा साधा कचरा रॅम्पही रद्द

हडपसरला आणखी एक कचरा प्रकल्प

पुणे-महापालिकेच्या मुख्यसभेत पुन्हा 'कचऱ्याचे' राजकारण दिसून आले. रामटेकडी येथे सॅनिटरी पॅडवर प्रक्रिया करणारा प्रकल्प सीएसआरमधून उभारण्यास हडपसर भागातील नगरसेवकांनी आक्षेप घेतला. आधीच या भागात सर्वाधिक कचरा प्रकल्प असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही सत्ताधारी भाजपने मतदानाच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, त्याचवेळी कचरा वाहतुकीसाठी बावधन येथील जकात नाक्‍याच्या जागेवर कचरा रॅम्प उभारण्याच्या प्रस्ताव मात्र, सत्ताधारी नगरसेवकाच्या मागणीनुसार रद्द करण्यात आला. त्यामुळे हडपसर परिसरात नागरिक राहत नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडून एका खासगी कंपनीकडून तब्बल 25 कोटी रुपयांचा सॅनिटरी नॅपकीन प्रक्रीया प्रकल्प रामटेकडी येथील रोकेम प्रकल्पाच्या जागेत उभारला जाणार आहे. हा प्रस्ताव मुख्यसभेत आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हडपसर भागातील नगरसेवक योगेश ससाणे, माजी महापौर वैशाली बनकर यांनी आक्षेप घेतला. त्यात 72 विरोधात 26 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, त्यानंतर अवघ्या तासाभरातच बावधन येथील महापालिकेच्या जकात नाक्‍याच्या ठिकाणी कचरा संकलन रॅम्प उभारण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत आला. कोथरूड कचरा डेपोच्या जागेवर हा रॅम्प होता. मात्र, त्या ठिकाणी मेट्रोचा डेपो झाल्याने तो बंद करण्यात आला. त्यामुळे बावधन येथील जकात नाक्‍याची पीएमपीला दिलेली जागा घनकचरा विभागास देण्यात आली. मात्र, या रॅम्पचे काम सुरू होण्यापूर्वीच शहर सुधारणा समितीत नागरिकांचा विरोध असल्याचे सांगत रॅम्पचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर तो आज मुख्यसभेतही मान्य करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post