वैचारिक बांधिलकी स्वीकारून सक्रिय सहभाग हीच शांताराम बापूंना खरी आदरांजली




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी ता. ३ ,समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश शांतारामबापू गरुड हे थोर स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत होते.तसेच प्रबोधकांचे प्रबोधक होते.लोकप्रबोधन ही सार्वकालिक चालणारी प्रक्रिया असते. स्वातंत्र्यलढ्याच्या आशय आणि संविधानाची  मूल्ये या समर्थ पायावर आधारित भारताची वाटचाल झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. ती विचारधारा आत्मसात करून निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी तयार झाले तर शोषण रहित समतावादी समाजरचनेचे उद्दिष्ट आकाराला येईल यावर त्यांचा विश्वास होता. त्यासाठी हे ज्ञानपीठ स्थापन केले.आज समाजवादी प्रबोधिनीचे काम वाढत्या लोकसहभागाने अधिक व्यापक करणे आणि त्यासाठी  या विचारधारेशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने सर्व प्रकारचे सहकार्य करून ही चळवळ मजबूत करणे हीच शांताराम बापूना दहाव्या स्मृतिदिनाची खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आचार्य शांताराम गरुड यांच्या दहाव्या स्मृतिदिनी आयोजित अभिवादन सभेत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. प्रारंभी शांतारामबापूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शशांक बावचकर यांनी शांतारामबापूंच्या कार्यकर्तृत्वाचा व त्याचा आजच्या संदर्भाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी झालेल्या चर्चेत असे मत व्यक्त झाले की, शांतारामबापूंनी भारतीय संस्कृती,भारतीय तत्वज्ञान, गांधीवाद, लोकशाही समाजवाद,आंबेडकरवाद यासह सर्व विचारधारांचे नेमके प्रशिक्षण व समकालीन राजकीय,सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्याचे आकलन कार्यकर्त्यांना व्हावे यावर  भर दिला. आज सैद्धांतिक व नैतिक विचार संपन्नतेची सर्वांगीण पोकळी वाढत असतांना समाजवादी प्रबोधिनीचे काम अधिक गतिशील करण्यासाठी या मूल्याबद्दल आस्था असणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकांनी सहभाग नोंदवला पाहिजे.पुरोगामी ,प्रबोधनाच्या चळवळीतील प्रत्येकाने खऱ्या अर्थाने कृतिशील पद्धतीने विवेकनिष्ठ,विचारनिष्ठ झालेच पाहिजे हा शांतारामबापूंचा आग्रह त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी तीव्रतेने पुन्हा पुन्हा ध्यानात घेतला पाहिजे व कृतीत आणला पाहिजे ही काळाची मागणी आहे

यावेळी प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, जयकुमार कोले,प्रा.रमेश लवटे,पांडुरंग पिसे,अन्वर पटेल,शिवाजी शिंदे, दयानंद लिपारे,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी,शंकरराव भाम्बीष्टे, नौशाद शेडबाळे, प्रा.सौरभ मोरे,प्रा.मिलिंद दांडेकर, अरुण दळवी,शंकर पदकी, शिवाजी साळुंखे,सुधीर साबणे,मुरलीधर पाटील,सचिन जाधव ,विशाल अमृते,भीमराव नायकवडी आदी उपस्थित होते. नंदकिशोर जोशी,अमित कांबळे,गौस पठाण हेही उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post