मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागांत पाणी साचून उपनगरीय लोकल सेवा, बेस्ट सेवा आणि रस्ते वाहतूक सेवेला फटका



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई  : पहाटेपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागांत पाणी साचून उपनगरीय लोकल सेवा, बेस्ट सेवा आणि रस्ते वाहतूक सेवेला फटका बसला. शीव-कुर्ला आणि चुनाभट्टीत रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली तर पश्चिम रेल्वेच्या लोकल मंदावल्या. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. रस्त्यावर पाणी भरल्याने बेस्टचे अनेक मार्ग अन्यत्र वळविण्यात आले. दृश्यमानता घटल्याने पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

शीव-कुर्ला-चुनाभट्टी भागात रेल्वे ट्रक पाण्याखाली गेल्याने सुरुवातीला साकाळी 9.50 वाजता सीएसएमटी ते कुर्ला लोकल सेवा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली. नंतर 10.20 वाजण्याच्या दरम्यान ठाणे ते कुर्ला आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद झाली. यादरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वे आणि बेलापूर-सीवूड ते खारकोपर या मार्गावरील तसेच कर्जत-कसारा ते ठाणे आणि वाशी ते पनवेल शटल फेऱया सुरू ठेवण्यात आल्या होत्या.पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक बंद तर चर्चगेट ते विरार मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. शीव-किंग्ज सर्कलसह शहरात अनेक सखल भागांत पाणी साचल्याने बेस्टचे अनेक मार्ग अन्यत्र वळविण्यात आले. दृश्यमानता घटल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहतूककोंडी निर्माण झाली. त्यामुळे घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडणाऱया अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांना जागोजागी अडकून पडावे लागल्यामुळे त्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.

बेस्टच्या 50 हून अधिक बस बिघडल्या

मुंबईत सखल भागांत पाणी भरल्याने बेस्टच्या 50 हून अधिक बस पाण्यात अडकून बंद पडल्या. बुधवारी बेस्टच्या 3349 बसेस चालविण्यात आल्या होत्या. बेस्टच्या 80 हून अधिक मार्गांवरील बसेस पाणी साचल्याने अन्यत्र वळविण्यात आल्या. मानखुर्द स्थानक, शीव रोड क्र. 24, अॅण्टॉप हिल सेक्टर-7, गांधी मार्पेट, कमानी ते तेल बाजार, हिंदमाता सिनेमा, एअर इंडिया कॉलनी, एस. व्ही. रोड, नॅशनल कॉलेज, आरसीएफ कॉलनी, अंधेरी मार्पेट, खोदादाद सर्कल, दहिसर चेक नाका, चुनाभट्टी बस स्थानक, गोरेगाव-सिद्धार्थ नगर, माहीम येथे बेस्टची वाहतूक वळविण्यात आली.


लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत


मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक जोरदार पावसामुळे चांगलेच कोलमडले. सीएसएमटी ते गोरखपूर, वाराणसी, भुवनेश्वर, हावडा, हैदराबाद, शालिमार एक्प्रेसला याचा फटका बसून या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. या गाडय़ांचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

सहा पंपिंग स्टेशनमुळे मोठा पूर टळला! सलग आठ तास पाण्याचा उपसा

मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी साचले असले तरी पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाण्याचा निचरा केल्यामुळे मुंबई मोठा पूर येण्यापासून वाचली. सहा पंपिंग स्टेशन सलग सहा तास कार्यरत राहून पाण्याचा निचरा करीत होते. त्यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक सुरू ठेवण्यात यश आल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही मुसळधार पावसात भेटी देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

एकीकडे अवघ्या 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना सकाळी 11.45 वाजता समुद्रात 4.16 मीटर उंच लाटांची भरती होती. साहजिकच पावसाचे पाणी वाहून नेणाऱया वाहिन्या तसेच नाल्यांमधील पाणी समुद्रामध्ये जाणे शक्य होत नव्हते. अशा वेळी पाणी साचण्यास सुरुवात होत असतानाच पालिकेने तातडीने आवश्यक त्या ठिकाणचे पंप कार्यान्वित केले. सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान संपूर्ण मुंबईत मिळून 45 पंप पाण्याचा निचरा करत होते. तर दुपारी 1 ते 2 दरम्यान जोरदार पावसाच्या प्रसंगी 197 पंप सुरू होते. स्वाभाविकच ठिकठिकाणच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यास मदत झाल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

…म्हणूनच तुंबते पाणी

मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांमधून प्रतितास 30 मिमी इतक्या वेगाने कोसळणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आहे. मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे प्रतितास 60 मिमी वेगाने पाऊस कोसळू लागल्यास नाले व पर्जन्य वाहिन्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाहून ते साचण्याची समस्या निर्माण होते. अतिवृष्टी सुरू असताना समुद्राला भरती आल्यास सखल भागांमध्ये ही समस्या अधिक जाणवते.

Post a Comment

Previous Post Next Post