सध्याचा खंबाटकी घाट रस्ता इतिहास जमा होणार..



सातारा - पुणे-सातारा महामार्गावरून ये-जा करण्यासाठी खंबाटकी बोगदा आणि रस्त्याचे काम दळणवळण बंदीच्या काळातही जोरात चालू आहे. त्यामुळे आता पुणे-सातारा असा प्रवास करण्यासाठी खंबाटकी बोगद्यातून जावे लागणार असल्याने सध्याचा खंबाटकी घाट रस्ता इतिहास जमा होणार आहे, तसेच या बोगद्यामुळे पुण्याहून सातार्‍याकडे जाण्यासाठी ८ किलोमीटरचे अंतरही संपुष्टात येणार आहे.

खंबाटकी घाटात धोकादायक इंग्रजी 'एस्' आकाराच्या तीव्र उताराच्या वळणावर आणि घाटरस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. या घटनेचे गांभीर्य पहाता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे धोकादायक वळण काढण्यासाठी येथे २ बोगद्यांसह ६.४६ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला २८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी संमती दिली होती.या कामाचे ४९३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. हे काम सलग ३ वर्षे चालू रहाणार असून २७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी बोगदा आणि रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहेत. नंतर तातडीने हा रस्ता उपयोगात आणला जाणार आहे. एकूण ६.४६ किलोमीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला १.२ किलोमीटरचे आहेत. पुण्याच्या बाजूकडे जातांना बोगदा संपल्यानंतर कॅनलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाणपूल असणार आहे. कॅनलपासून पारगाव खंडाळा येथील सेवा रस्त्यापर्यंत भराव टाकून हा रस्ता करण्यात येणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर सातारा येथून पुण्याकडे जातांना सध्या वाहतूक चालू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणे बंद रहाणार आहे. त्यामुळे धोकादायक 'एस्' आकाराचे वळणही इतिहास जमा होणार आहे. पुण्याहून सातारा येथे जाण्यासाठी सध्या चालू असलेला आणि घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी चालू राहिल. सातारा बाजूकडे या बोगद्याला सुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे आणि गोल 'आयकॉन' बनवण्यात येणार आहेत. तर पुणे बाजूकडे उड्डाण पूल बनवण्यात येणार असून तेथेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ प्रतिशत काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती 'महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणा'कडून देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post