शेतकरी वर्ग ट्रॅक्टर ऐवजी आता पुन्हा सर्जा-राजाच्या जोडीकडे वळला.प्रेस मीडिया वृत्तसेवा :

दिवसेंदिवस इंधन दरात होत असलेली वाढ आणि बाजारातील आर्थिक मंदी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे शेतीची मशागत, पेरणीसह अन्य कामांसाठी शेतकरी वर्ग ट्रॅक्टर ऐवजी आता पुन्हा सर्जा-राजाच्या जोडीकडे वळला आहे. बैलांच्या साह्याने शेतीतील मशागत सुरू केली आहे.

सुपा, राळेगणसिद्धी, पानोली, जातेगाव, पिंपळनेर, पानोली, वडुले, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण या भागात मान्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. शेतकरी बी-बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद करू लागले आहेत.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्य़ांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले असतानाच पेट्रोल, डिझेलने शंभरी ओलांडली. त्यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. कोरोनाकाळात सर्वत्र बंद असल्याने उत्पादित माल शेतकऱ्य़ांना अल्प दराने विक्री करावा लागत होता. त्यातच दुधाला कमी भाव मिळत आहे. या सर्वांमुळेच ग्रामीण भागातील शेतकऱ्य़ांचे अर्थकारण कोलमडले आहे. तरीही या सर्व समस्यांना तोंड देत ग्रामीण भागातील शेतकरी पुन्हा एकदा नव्याने उभं राहत त्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये मूग, वाटाणासह बाजरी, उडीद, तूर या पिकांचा समावेश आहे. कांदा व फूलशेतीसाठीही बळीराजाची लगबग चालू झाली आहे.

दरम्यान, डिझेल व पेट्रोलचे दर शंभरच्यापुढे गेले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेती करणं सामान्य शेतकऱ्य़ांना परवडणारे नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी बैलांच्या मदतीने शेती करण्याकडे वळला आहे.

Post a Comment

0 Comments