बुद्धिजीवी व रसपूर्ण शायर " शहरयार "

 




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी 

(९८ ५०८ ३० २९०)

अखलाख मोहम्मद खान  उर्फ शहरयार हे उर्दू व हिंदीतील अतिशय ख्यातनाम शायर होते. शहरयार म्हटलंकी ' इन आखों की मस्ती के मस्ताने हजारो है ' या ' उमराव जान ' मधील गीतापासून 'गबन '' मधील 'सीने मे जलन आखों  मे तुफान सा क्यों है ,इस शहर में हर शक्स परेशानसा क्यूँ है ' या गझलेपर्यंतच्या अनेक उत्तमोत्तम रचना आठवतात.अशा या महान शायराचा १६ जुन २०२१ रोजी पंच्याऐंशीवा जन्मदिन आहे. शहरयार १६ जून १९३६ रोजी जन्मले आणि १३फेब्रुवारी २०१२ रोजी अलिगढ येथे फुफुसांच्या कर्करोगाने कालवश झाले. त्यांच्या पंच्याऐंशीव्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

शहरयार यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील ओनला' या गावी झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात अधिकारी होते. सहाजिकच वडिलांच्या फिरत्या नोकरीमुळे शहरयार यांचे शिक्षण अनेक ठिकाणी झाले.विद्यार्थी दशेत ते उत्तम हॉकी खेळाडू होते.तरुणपणापर्यन्त ते शायरीकडे वळले नव्हते.खलिरूर रहमान आजमी या त्यांच्या ज्येष्ठ रसिक मित्राने त्यांना शायरीची गोडी लावली. ' शहरयार ' हे टोपणनावही त्यांनीच दिले. १९६१ साली अलिगड मुस्लीम विद्यापीठातून शहरयारनी उर्दू भाषेत एम.ए.केले. नंतर तेथेच ते  प्राध्यापकही. झाले १९६५ साली ' इल्म ए आजम ' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचे सातवा दर ( १९७०),हिज्र के मौसम (१९७८) ,खाब का दर बंद है (१९८५ ),काफिले यादो के (१९८७),मेरे हिस्से की जमीन (१९९८),मिलता राहुंगा खाब मे ( २०००) असेअनेक संग्रह आले. ते अतिशय कुटुंबवत्सल गृहस्थ होते. ते स्वतः उत्तम स्वयंपाक करत असत. त्यांना तीन मुले होती. काही कारणाने त्यांचा घटस्फोट झाला होता.ते लिहितात,


        आज भी है तेरी दूरी ही उदासी का सबब

        ये अलग बात कि पहिली सी नही, कुछ कम है..


          शिकवा कोई दरिया की रवानी से नही है

         ये रिश्ता है मेरे प्यास का पानी से नही है..

अनेक चित्रपटांमधून त्यांची गीते व गझला लोकप्रिय होत गेल्या. २०१० साली शहरयार यांना २००८ सालीचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ' 'ज्ञानपीठ पुरस्कार ' मिळाला होता. तो जाहीर करताना ज्ञानपीठ या समितीने म्हटले होते कि ,"बुद्धीजीवी कवी असा लौकिक असलेल्या शहरयार यांच्या कविता स्वानुभवावर आणि आधुनिकतेच्या समस्यांवर आधारित असतात. त्यांची कविता एखादा संदेश देण्याच्या किंवा निष्कर्ष काढण्याच्या फंदात पडत नाही. उलट आधुनिक व्यक्तीला भेडसावणाऱ्या  आध्यात्मिक समस्या आणि मानसिक अस्वस्थता त्यात मांडलेली असते."

    जिंदगी जब भी तेरी बज्म मे लाती है हमे

    ये जमी चाँद से बेहतर नजर आती है हमे,

    हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है ?

    अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..

'तुझ्याजवळ येतो तेव्हा ही पृथ्वी प्रत्येकवेळी चंद्रापेक्षाही सुंदर वाटते. पण प्रिये आपल्या प्रत्येक मिलनाचा शेवट असा विर हाने दूर जाण्यातच का होतो ?या चिंतेने मला ग्रासलेले असते.' असे लिहिणारे शहरयार आणखी एका ठिकाणी म्हणतात, जिकडे बघावे तिकडे माणसे स्वतःच्याच काळजीत आहे. बोलण्यासाठी जीभ जरूर आहे.पण ज्याच्याशी आपले सूर जुळतील असं कुणीच दिसत नाही.

      जिसे भी देखिये, वो अपने आप में गुम है

      जुबां मिली है ,मगर हमजुबां नही मिलता.. 

 शहरयार उर्दूतील बडे शायर होते.उर्दू शायरीला जी मोठी परंपरा आहे या परंपरेला आधुनिकतेची जोड त्यांनी दिली. त्यांच्या कवितेत परंपरा आणि नवता यांची उत्तम सांगड दिसते.मानवी जीवनात निर्माण होणारी सर्व वादळे, सर्व प्रश्न शहरयार यांना अस्वस्थ करतात. बदलती मूल्ये आणि परिवर्तनशील जगातील अनुभव त्यांच्यातल्या शायराला लिहायला प्रोत्साहित करतात.वाढते शहरीकरण आणि त्यातील समस्या याने ते अस्वस्थ होतात.आणि लिहितात,

        तुम्हारे शहर मे कुछ भी हुआ नही है क्या

         की तुमने चिखों को सचमुच सुना नही है ..

         मै उक्त जमाने से हैरान हुं की हाकीमे शहर

         जो हो रहा है उसे देखता नही है क्या...

वाढता उपभोगवाद ,चंगळवाद यामुळे आपण काहीतरी गमावून बसलो आहोत याचे दुःख शहरयार यांना आहे.पण त्यामुळे ते हतबल होत नाहीत.परिस्थितीशरण होत नाहीत. तर नव्या जगाचे स्वप्न ते पाहतात.या काळोख्या वातावरणात जीवनमूल्यांचा दिवा तेवत ठेवला पाहिजे अशी त्यांची धारणा होती.व्यवस्थेतील अंतर्विरोध आपल्या काव्यातून ते व्यक्त करतात. समाजात जो कंगालपणा वणवणत राहीलाआहे त्याची मांडणी ते व्यंगात्मक शैलीतून करतात.काल वाईट असलेली माणसे एकाएकी आज चांगली कशी वाटायला लागतात ? हा प्रश्न त्यांना पडतो. या जगात इतका अनाचार माजलेला असताना हे जग तुम्हाला अनुकूल कसे वाटते? असा प्रश्न ते उपस्थित करतात.


      जो बुरा था कभी अब हो गया अच्छा कैसे

       वक्त के साथ में इस तेजी से बदला कैसे 

       बारहा पूछना चाहा कभी हिम्मत न हुई

       दोस्तो रास तुम्हे आई ये दुनिया कैसे..

       जिंदगी मे कभी एक पलही सही और कैसे 

       खत्म हो जाता है जीने का तमाशा कैसे..

संकटांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य शहरयार यांच्या कवितेतून दिसून येते.सखोल सामाजिक-राजकीय चिंतन असूनही ,डाव्या विचारांचा प्रभाव असूनही शहरयार यांची कविता प्रचारकी वाटत नाही. याचे कारण आशयाइतके ते कवितेच्या ,गझलेच्या कलात्मकतेलाही महत्त्व देतात. म्हणूनच समकालीन प्रश्नांची मांडणी करत असतानाच शहरयार यांची कविता आपल्याला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रेमाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन देते.

       मै दु:खी हू हम सब ये कहते है खुशी की बात

        अब अंधेरे की जबां पर रोशनी की बात है...

 असे लिहिणाऱ्या शहरयार यांनी ' दिल चीज है क्या, आप मेरी जान लिजिये , जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने ,इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने....यासारख्या अनेक सार्वकालिक श्रेष्ठ रचना रसिकांना दिल्या. सुप्रसिद्ध साहित्यिक कमलेश्वर यांनी शहरी यांच्याबाबत म्हटले आहे की," शहरयार वाचताना मला अनेकदा थांबावे लागते. कारण मला त्यांचे लिखाण विचारप्रवृत्त करते. त्यांचे टोकदार शब्द वास्तवाची प्रखर मांडणी करतात. त्यांची शायरी एक सामाजिक - सांस्कृतिक विचारधारा घेऊन येते..." असा हा महान शायर साहित्य क्षेत्रावर आपली अमिट मुद्रा उमटून गेला. त्यांचे शब्द पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील ,शिकवण देत राहतील. सगळ्यांनाच आपलासा वाटणारा हा शायर एके ठिकाणी म्हणतो

 

      मुझको अपना न कहा इसका गिला तुझसे नही

      इसका शिकवा है कि बेगाना समझती क्यूँ हो..

      

 शहरयार यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन..

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post