पुणे : मित्रांसोबत कॅनोलमध्ये पोहण्यासाठी गेलेला अल्पवयीन मुलगा वाहून गेला आहे. मागील पाच दिवसांपासून त्याचा मृतदेह सापडला नसून अग्निशमन दलाच्या जवानांकडून अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरातील कॅनोललगत मृतदेह आढळून आल्यास पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन हडपसर पोलिसांनी केले आहे. श्रुशीकेश नेमिनाथ आवाड (वय 17) असे वाहून गेलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुशीकेश 13 मे ला मित्रांसोबत शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कॅनोलमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी श्रुशीकेशला पोहताना दम लागल्याने तो बुडाला.त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे श्रुशीकेश वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. मात्र अद्यापही त्याचा मृतदेह मिळून आला नाही. संबंधिताचा मृतदेह आढळून आल्यास हडपसर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.