लॉकडाऊनमुळे येणारा कंटाळा दूर होऊन काही काळ आनंदात न्हाऊन निघावा या संकल्पनेतून रसना कॉर्नर परिसरात शासन निर्बंधांचे पालन करत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आलाइचलकरंजी - प्रतिनिधि : 

कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर वाढती चिंता अन् लॉकडाऊनमुळे येणारा कंटाळा दूर होऊन काही काळ आनंदात न्हाऊन निघावा या संकल्पनेतून रसना कॉर्नर परिसरात शासन निर्बंधांचे पालन करत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सोशल डिस्टन्सचे पालन करत घरच्या टेरेसवर कु. गंधाली गजानन पारनाईक आणि कु. सानिका दिनेश फडके या नवोदीत कलाकारांनी कथ्थक-भरतनाट्यम आणि शास्त्रीय व नाट्य संगीताच्या माध्यमातून आपल्या शेजार्‍यांचे मनोरंजन करुन घरात बसून आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला.

गत वर्षीपासून आपल्या देशावर कोरोना महामारीचे संकट उद्भवले आहे. गत वर्षी या संकटाबद्दल नाविन्यता असल्याने फारसे भय वाटले नाही. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असून राज्य व जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. घरातून कोणालाच बाहेर पडता येत नसल्याने दिवस कसा घालवायचा या विवंचनेत सर्वजण आहेत. ही मरगळ झटकून काही काळ तरी आनंद आणि उत्साह मिळावा या संकल्पनेतून गजानन पारनाईक, सौ. प्राची पारनाईक आणि दिनेश फडके, सौ. दीपाली फडके यांनी घरच्या टेरेसवर हा मनोरंजनाचा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्याला कु. गंधाली पारनाईक व कु. सानिका फडके यांची सुरेख साथ मिळाली. या उपक्रमाबद्दल परिसरातील सर्वांना कल्पना देऊन कोरोना काळात मनोरंजनाचा आनंद घेण्याची विनंती केली. आणि शेजार्‍यांचाही प्रतिसाद लाभला.

या उपक्रमाची सुरुवात महिषासुर मर्दानी स्त्रोत्राने करण्यात आली. कोरोनाच्या सर्व शासन नियमांचे पालन करत सुमारे तासभर चाललेल्या या कार्यक्रमात कु. गंधाली हिने कथ्थक व भरतनाट्यमचे उत्तम सादरीकरण केले. तर कु. सानिका फडके हिने शास्त्रीय व नाट्य संगीतासह जुन्या-नव्या हिंदी मराठी गीतांचा नजराणा पेश केला. त्याला सौ. दीपाली फडके यांच्या सुरेख निवेदनाने आणखीन रंग भरला. भागातील नागरिकांनी आपल्या घरच्या टेरेसवरुन या कार्यक्रमाचा आनंद लुटताना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे लॉकडाऊन काळात मनावर आलेली मरगळ दूर होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कु. गंधाली हिने नृत्य विशारद सौ. सायली होगाडे यांच्याकडे भरतनाट्यम व कथ्थक चे धडे घेतले असून सध्या ती अनुराधा पटवर्धन यांच्याकडे पुढील प्रशिक्षण घेत आहे. तिने आतापर्यंत भरतनाट्यमच्या 5 व कथ्थकच्या 3 परीक्षा झाल्या आहे. तर कु. सानिका फडके हिने मंगला जोशी (सांगली) यांचेकडे शास्त्रीय व नाट्य गायनाचे धडे घेतले असून ती मध्यमापूर्ण परीक्षेची तयारी करत आहे.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post