काल ११ मे रोजी आपल्या समाजवादी प्रबोधिनीने पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केले



बंधू - भगिनींनो,

काल ११ मे रोजी आपल्या समाजवादी प्रबोधिनीने पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केले.त्यानिमित्ताने सर्वांच्या शुभेच्छाही मिळाल्या.याबद्दल मनापासून आभारी आहे.खरंतर हा आपण सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा देत संघटितपणे पुढे जाण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे असे मी मानतो. समाजवादी प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनातील हा  छत्तीसाव्वा वर्धापन दिन आहे.मी  प्रत्येक वर्धापनदिनाला गतवर्षी पेक्षा अधिक कार्यरत राहण्याचा संकल्प करतो व तसा प्रयत्न  करतो.अर्थात गेले वर्षभर कोरोनाने फार मोठी हानी झाली व काहीसे पिछाडीवर जावे लागतंय हे खरं.पण हा कालखंड लौकरच संपेल व आपण हा अपरिहार्य असलेला पॉज घेऊन नव्या दमाने पुढे जाऊ यात शंका नाही. कालवश शांतारामबापू,शहीद कॉ.गोविंद पानसरे ,संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष मा.प्रा.डॉ.प्रा.एन.डी.पाटील आणि  तत्कालीन सर्व  सहकारी यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन आपण कार्यरत आहोत.आज आपण सर्वांच्या सहकार्यातून व सातत्यपूर्ण  उपक्रमशीलतेतून सक्रिय आहोत. आजच्या अस्वस्थ वर्तमानात ,बदलल्या काळात आपल्या प्रबोधन चळवळी पुढील आव्हाने अधिक व्यापक झाली आहेत.आपण मानत असलेल्या व मांडत असलेल्या मूल्यांवर गंभीर व सामूहिक हल्ले होत आहेत.अर्थात आपण  प्रबोधनाचा विचार सुसंगतपणे, टोकदारपणे ,निर्भीडपणे मांडत असतोच असतो. पण परिस्थितीची आव्हाने बिकट होत जातात तेंव्हा आपल्या विचार प्रस्थापनेसाठी  वैचारिक दृष्ट्या अधिक नेमके ,परिपूर्ण,प्रगल्भ आणि संघटित होत आपण कार्यरत राहण्याची गरज असते. तसे राहूया असा संकल्प आज पंचेचाळीसाव्या वर्षातील पहिल्या दिवशी आपण सर्वजण करूया.काल दिवसभर शब्दशः शेकडो सहकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा मोठ्या बळ देणाऱ्या आहेत.आपला प्रत्येकाचा सक्रिय सहभाग व सर्वांगीण सहकार्यच हे प्रबोधनाचे संस्थात्मक कार्य पुढे नेऊ शकते.त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे योगदान वाढते राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.आपल्या शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो.धन्यवाद.


आपला स्नेहांकित

प्रसाद माधव कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post