सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने राज्यातील मजूर संस्थांना देण्यात येणार्‍या कामांची मर्यादा 3 लाखावरुन 10 लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला




इचलकरंजी -  आश्विन लोहार.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने राज्यातील मजूर संस्थांना देण्यात येणार्‍या कामांची मर्यादा 3 लाखावरुन 10 लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भातील अध्यादेश 20 मे 2021 रोजी शासनाने जारी केला असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी मजूर संस्था संघाचे माजी चेअरमन मुकूंद पोवार यांनी दिली. या निर्णयामुळे लहान-लहान मजूर संस्थांनाही आता कामे मिळतील, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विविध प्रकारची शासकीय कामे मजूर संस्थांना देण्यात येत होती. त्याची मर्यादा ही 3 लाखापर्यंत होती. त्यामुळे लहान लहान मजूर संस्थांना कामे मिळण्यात अडचणी येत होत्या. 3 लाखाची ही मर्यादा वाढविण्यात यावी यासाठी राज्य मजूर संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होत्या.  या संदर्भात तत्कालीन विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली होती. या संदर्भात नाना पटोले यांनी सहकार व बांधकाम विभागाचे मंत्री व अधिकार्‍यांची मिटींग घेत हा प्रश्‍न मार्गी लावण्यास सांगितले होते. आजवर केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून मर्यादा 10 लाखापर्यंत वाढविण्यात आल्याने त्याचा फायदा राज्यातील 12 हजार मजूर संस्थांमधील 15 लाख सभासदांना होणार आहे, असे पोवार यांनी सांगितले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित हा प्रश्‍न सुटल्याने राज्यातील महाआघाडी सरकारचे राज्य सहकारी संघाचे संचालक मुकुंद पोवार यांनी अभिनंदन केले आहे.

इचलकरंजी -

वस्त्रनगरीबरोबरच इचलकरंजी ही दानशूरांची नगरी आहे. प्रत्येक संकटकाळात शहरातील मुस्लिम समाज मदतकार्यासाठी हिरिरीने पुढे येतो. अशा या इचलकरंजीत काम करण्याची आम्हांला संधी मिळाली याचा आम्हांला गर्व आहे, असे गौरवोद्गार अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी काढले.

शहर आणि परिसरावर उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे संकटकाळातही कोणीच उपाशी रहात नाही. त्याच अनुषंगाने समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्याप्रमाणे कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता अहोरात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या दहा दिवसाची एकवेळच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड व पोलिस अधिक्षक बाबुराव महामुनी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अजीज खान, कैश बागवान, गावभाग ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र लोहार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमाचे कौतुक करत पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी, इचलकरंजीत संकटसमयी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. त्यामध्ये मुस्लिम समाजाचाही मोलाचा वाटा असल्याचे सांगत पोलिस प्रशासनातर्फे आभार व्यक्त केले. याप्रसंगी तौफिक मुजावर, सलीम अत्तार, इम्तियाज म्हैशाळे, अबु पानारी, शफिक मुजावर, जाफर मुजावर, इम्रान मकानदार, फारूक मुजावर, पप्पु खान, हाफिज शकील देसाई, अबुबकर, सनदी, मुस्तफा समडोळे, राजू मुल्ला, अल्ताफ सनदी, दिलावर मोमीन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

इचलकरंजी -

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. अशावेळी आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य जोपासणे आपली जबाबदारी, कर्तव्य ओळखून प्रभाग 26 मध्ये नगरसेविका सौ. सायली लायकर यांनी औषध फवारणी करुन घेतली. यावेळी त्यांनी स्वत: ट्रॅक्टरचे सारथ्य करण्यासह नागरिकांनी शासन निर्बंधाचे पालन करत माझं कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी राज्य, जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रयत्नात सहभागी होत माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने प्रभाग 26 मधील नगरसेविका सौ. सायली लायकर यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी हत्तीचौक, सुदर्शन चौक, आरपी रोड, बावणे गल्ली, शाहू कॉर्नर, कागवाडे मळा यासह परिसरात औषध फवारणी केली. यावेळी त्यांनी स्वत: ट्रॅक्टरचे स्टेअरींग हाती घेत सारथ्य केले. याआधीही जिम्नॅशियम हॉल येथे लसीकरण केंद्र सुरु करुन प्रभागातील नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. या केंद्रासाठी आवश्यक यंत्रणा त्यांनी स्वत: स्वखर्चातून उभी केली. स्वत: पुढाकार घेऊन यंत्रणा उभी करण्यासह जबाबदारी पेलणार्‍या त्या पहिल्याच महिला नगरसेविका आहेत. जनताप्रती असलेल्या जबाबदारीचा आदर्शच लोकप्रतिनिधींसमोर निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

सौ. लायकर यांच्या या कार्यात दत्तात्रय कित्तुरे, पप्पू पाटील, श्रीशैल कित्तुरे, रणजित सावंत, बजरंग हावळ, ज्ञानेश्‍वर उरणे, अथर्व हावळ, तनया कित्तुरे, प्रगती कोंडेकर, उमा कांबळे, अभिजित कांबळे, अनिल कांबळे, रवि सावंत, ईश्‍वर सुतार, सुनिल रसाळ, बबन भागवत, अरविंद बडवे व अमित खानाज यांचे सहकार्य लाभत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post