पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण जिह्यात कोविशिल्ड लसीचा साठा संपला, हजारो नागरिकांनी नोंदणी करूनही त्यांना लसींचा साठा संपल्याने परत जावे लागले.



 पुणे :  पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिह्यातील कोरोना लसींचा साठा गुरुवारी सायंकाळपर्यंत संपला असून, 546 लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवला. दिवसभरात 152 केंद्रे लसीअभावी बंद ठेवावी लागली. तर सुरू असणाऱया केंद्रांवर निम्म्यापेक्षा कमी लोकांनाच लस द्यावी लागली. नोंदणी केलेल्या अनेक नागरिकांना केंद्रावरून घरी परतावे लागले. केंद्र सरकारकडून पुरवठय़ाबद्दल कोणतेही आदेश न मिळाल्याने जिह्यात उद्या लसीकरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, लस साठा संपल्यामुळे कोल्हापूरात 200, सांगलीत 112 केंद्रे बंद झाले आहेत. सातारातही लसीकरण ठप्प असून, नगरमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच लस साठा उपलब्ध आहे. सोलापुरला साडेसहा लाख डोसची गरज असताना केवळ 19 हजार 500 डोस मिळाले आहेत.लसींचा तुटवडा असल्याने भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस काही प्रमाणात उपलब्ध आहे. ती फक्त कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठीच वापरावी, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण जिह्यात कोविशिल्ड लसीचा साठा संपला आहे. ग्रामीण जिह्यात आज 318 पैकी 123 लसीकरण केंद्रे बंद होती. पुणे शहरात 129 पैकी 14, तर पिंपरी-चिंचवडमधील 99 पैकी 15 केंद्रे लसी अभावी बंद ठेवावी लागली. आज दिवसभरात 39 हजार जणांना लसीकरण होऊ शकले. हजारो नागरिकांनी नोंदणी करूनही त्यांना लसींचा साठा संपल्याने परत जावे लागले.

पुणे महापालिका क्षेत्रात सायंकाळपर्यंत लसींचा साठा शून्य झाला. पुणे ग्रामीण जिह्यात तीन हजार डोस, तर पिंपरी-चिंचवडमध्ये उपलब्ध करून दिलेले 15 हजार लसींचे डोस दुपारीच संपल्याने केंद्रे बंद करावी लागली.

पुणे जिह्यात 10 लाख जणांनी घेतली लस

संपूर्ण पुणे जिह्यात10 लाख 59 हजार 497 नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. ग्रामीण जिह्यात 4 लाख 89 हजार, पुणे महापालिका क्षेत्र 3 लाख 41 हजार 628 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 2 लाख 30 हजार869 नागरिकांनी लस घेतली आहे. संपूर्ण जिह्यात 6 लाख 12 हजार जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सद्यस्थितीत 19 हजार 907 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 64 हजार 619 जण गृहविलगीकरणात आहेत. आतापर्यंत 10 हजार 402 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post