क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाची देश पातळीवर दखल : गणपतराव पाटील यांची माहिती




  

हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.          .

क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाची देश पातळीवर दखल घेतली जात आहे. अनेकजण या प्रकल्पाला भेटी देऊन कौतुक करीत आहेत. त्यामुळे नापिक जमीन सुधारण्याची दृष्टी शेतकऱ्यांत निर्माण होण्याची गरज आहे. क्षारपड जमीन सुधारणे विषयी शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण झाली असून  शिरोळमधील शेतकरी नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी संघटित झाले आहेत. नापिक जमीन सुधारली तर यातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. भविष्यात जमिनी वाढणार नाहीत, मात्र शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे यासाठी लागेल ती मदत आपण करू, असे आश्वासन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिले. दरम्यान,पावसाळ्यापूर्वी शिरोळ परिसरातील क्षारपड जमिन सुधारण्याचा प्रकल्प पूर्ण करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

       शिरोळ येथील श्री बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प संस्थेच्या मार्फत ५५० एकर जमीन सुधारण्याचा पहिला टप्पा कामाचा शुभारंभ श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच खुदाईचा शुभारंभ करण्यात आला.

        नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, शिरोळ मधील शेतकऱ्यांनी नापीक जमीन सुधारण्यासाठी उशिरा का असेना संघटितपणा दाखविला आहे. शिरोळ भागातील जमिनी सुधारत असताना अडचणी आल्या तर त्यातून मार्ग काढला जाईल. त्याशिवाय या कामामध्ये  नगरपरिषदेचे सहकार्य राहील.

          हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले, जमीन क्षारपड झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. एका पिढीला त्याचा त्रास सहन करावा लागला. जर या जमिनी सुधारल्या तर आमच्या पुढील पिढ्या समाधानाने जगू शकतील ही दृष्टी घेऊन शेतकरी एकत्र येत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. या कामाला दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी भक्कम पाठबळ दिले आहे त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होणार असे सांगून त्यांनी कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्तचे चेअरमन  गणपतराव पाटील यांना कृषी क्षेत्रातील नामांकित पुरस्कारही मिळाला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. रेक्स पॉलीमर्स  सांगलीचे चंद्रशेखर दांडेकर यांनीही या कामाला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

 यावेळी दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, प्रा  मोहन पाटील, माजी सरपंच गोरखनाथ माने, संजय कोळी, नामदेव मोरे, लियाकत सनदी,  हरी कोरे,  बाबा पाटील- नरदेकर, धनाजी पाटील नरदेकर, अनिल साळुंके, किरण माने, अण्णासाहेब चौगुले, शिवाजी चुडमुगे, संजय चव्हाण, किरण पाटील, बबन बन्ने, बकुल बेळुंके, दिलीप चौगुले,  भास्कर चौगुले, अमित माने, गुरुप्रसाद देसाई, तातोबा चौगुले, कॉन्टॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, अमित माने, सुदर्शन डिग्रजे,राजेंद्र प्रधान, प्रकाश गावडे यांच्यासह शेतकरी, मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक तात्यासाहेब पाटील यांनी स्वागत केले. माजी सरपंच दरगू गावडे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post