*गणपतराव पाटील यांची पुनर्निर्माणाची चळवळ यशस्वी करणे काळाची गरज ज्येष्ठ पत्रकार वसंतराव भोसले यांचे प्रतिपादन*





    हातकणंगले तालुका प्रतिनिधी : आप्पासाहेब भोसले 

  निसर्ग वाचवायचा की नाही, निसर्गाबरोबर जगायचे की नाही? हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे. शेती करण्याला बदनाम का केले गेले? शेती करण्यामुळे आपण खलनायक कसे ठरलो? याचा फेरविचार करावा लागेल. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी जमीन क्षारपडमुक्त करण्याची जी चळवळ सुरू केली आहे, ती पुनर्निर्माणाची चळवळ आहे. ही चळवळ यशस्वी करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव भोसले यांनी केले.

 हेरवाड (ता. शिरोळ) येथे २५५ एकर जमीन क्षारमुक्त करण्याच्या कामाचा शुभारंभ वसंतराव भोसले यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्यानपंडित गणपतराव पाटील, जयसिंगपूर उदगाव बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र बागी, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, सरपंच सुरगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 वसंतराव भोसले पुढे म्हणाले, जीवन अधिक चांगले, संपन्न करण्यासाठी जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. आपल्या जीवनाबद्दलही फेरविचार करावा लागेल. आपल्या भागात हजारो हेक्टर जमीन क्षारपडीमुळे पडून गेल्याने शेतकर्‍यांचा प्रचंड तोटा झाला. पण गणपतराव पाटील यांनी ही जमीन पुन्हा वापरात आणण्यासाठी हे कौतुकास्पद प्रयत्न सुरू केले आहेत. शेतीचा आणि शेती करण्याच्या पद्धतीचा विचार न केल्यास आपण आणखी संकटात येऊ शकतो. त्यासाठी गणपतराव पाटील यांच्या क्षारपड मुक्तीच्या या पुनर्निर्माणाच्या या  कामाला सर्वांनी हातभार लावणे आणि तरुणांनी एकत्रित पुढाकार घेणे आवश्यक आहे.

व्याख्याते वसंतराव हंकारे म्हणाले, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून क्षारपड जमिनी पुन्हा पिकाऊ व्हाव्यात आणि काळ्या आईची सेवा करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे  शेतकऱ्यांच्या जीवनात  आर्थिक संपन्नता आली आहे.  गणपतराव पाटील यांचे शेतीमधील प्रयोग आणि क्षारपड मुक्तीचे काम पाहता  त्यांचा 'शेतीपंडित' म्हणून सन्मान व्हावा असे वाटते. 

      उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, शेतीला कमी लेखण्याचे कारण नाही. जुन्या पद्धती मोडीत काढण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत. हेरवाड (ता. शिरोळ) परिसरात  सुमारे २५५ एकर जमीन क्षारमुक्त करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यास आज सुरुवात झाली आहे. क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये चांगले उत्पन्न घेऊन कर्जफेड करून कर्जमुक्त झाले आहेत. दत्त कारखान्याच्या वतीने २०० टनांचे उद्दिष्ट ठेवून काम केले जात आहे. शेतकऱ्यांनीही अभ्यास करून क्षारपड मुक्तीचे काम लवकरात लवकर संपवण्याची गरज आहे. या कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही. दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समूह शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील.  दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार व प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी विधिवत पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आला.

   श्री दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, प्रा. मोहन पाटील, कॉन्ट्रॅक्टर किर्तीवर्धन मरजे, पिंटू पाटील, बाळासो सुतार, संजय सुतार तसेच शेतकरी उपस्थित होते. आभार सरपंच सुरगोंडा पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post