लॉकडाऊन अन निर्बंध लावतांना शेतकरी व शेतीला अत्यावश्यक सेवेत ठेवा......माणिकराव शिंदे यांची मागणी



येवला प्रतिनिधी : एकनाथ भालेराव

येवला,ता.१० : गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे शेती व शेतकरी हतबल झाले आहे.कोट्यवधीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता पूर्ण लॉकडाउनचा निर्णय झाला किंवा कडक निर्बंध लावले तरी शेतकरी व शेती व्यवसायाला पूर्णपणे अत्यावश्यक सेवेत ठेवा तसेच बाजार समित्या बंद ठेवू नका अशी मागणी येथील ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी केली आहे.

कोरोणाची रुग्ण संख्या वाढत असल्याने शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली, यावेळी लॉकडाऊनची गरज विशद करताना शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणीही चकार शब्दही काढला नसल्याने वाईट वाटले.वास्तविक गेल्या वर्षभरापासून शेतकरी स्वतःला धोक्यात घालून शेती उत्पादन करून त्याची विक्री करत आहे.त्यातच ढासळलेल्या बाजार भावासह अद्यापही शेतमालाला अपेक्षित उठाव नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे.तोटा सहन करूनही शेतकरी शेती पिकवत असताना त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही, उलट अत्यावश्यक सेवेत त्याचा समावेश करून शेती व शेतकऱ्यांची निगडित सर्व घटकांना या निर्बधातून सूट द्यावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

या वर्षातील हंगामाचा शेवट सुरू असून अनेकांचे उन्हाळ कांदे,भाजीपाला व इतर पिके शेतात उभी आहेत.मागील महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षाची पूर्ण वाट लागली असून आता तर बाजार पेठच ठप्प झाल्याने शेतमालाच्या भावावर परिणाम सुरू झाला आहे.शेतकऱ्यांना बाजार बंद असेल तर शेतमाल कुठे विक्री करावा हा मोठा प्रश्न असतो.मागील वर्षी तर याच महिन्यात शेतकऱ्यांनी अक्षरशा द्राक्षांचे बेदाना करून गावोगावी जाऊन विक्री केले,अशी परिस्थिती या वेळी शेतकऱ्यांवर येणार नाही यासाठी शेतीशी संबंधित सर्व व्यवहार सुरळीत ठेवावेत तसेच मार्च एन्डला सर्वत्र बाजार समित्या बंद असल्याने आत्ताशी कुठे लिलाव सुरळीत झाले आहे. त्यामुळे बाजार समिती ही बंद करू नयेत उलट  कुठल्याही सुट्टी न घेता कामकाज सुरू ठेवल्यास शेतकरीही टप्प्याटप्प्याने शेतमाल विक्रीला आणतात आणि गर्दी होत नाही असा अनुभव आहे.अधिक निर्बन्ध लावल्यास शेतकऱ्यांना ग्रामीण भागातून तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे ही मुश्कील होते मागील वर्षी हा अनुभव आल्याने आता असे किचकट निकष लावू नयेत व सर्व परिस्थितीला गांभीर्याने घेऊन शेतकरी, शेतमाल,बाजार समित्या,शेतमालाचे बाजार व संबंधित दुकाने बंदमध्ये सहभागी करू नये असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post