राज्य शासन जे निर्णय घेईल त्या निर्णयांची जिल्ह्यात कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील



सांगली :  कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंध याबाबत राज्य शासन जे निर्णय घेईल त्या निर्णयांची जिल्ह्यात कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या संबंधिच्या अनेक उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत त्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठकपालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अरूण लाड, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट गंभीर होत असून कोरोना आता जीवनशैलीचा भाग बनत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व या आजाराची गंभीरता कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्या असणारा लसीकरणाचा वेग चांगला असला तरी तो अधिक वाढला पाहिजे. याबरोबरच कोरोनाबाधित रूग्ण अनेकदा होम आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरताना आढळतात. अशा रूग्णांवर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलीस पाटील, आशा वर्कर्स व ग्राम दक्षता समित्यांनी अधिक दक्ष राहून कोरोनाबाधीत रूग्ण घराबाहेर पडणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी. रेमडेसिव्हीअरचा काळाबाजार होवू नये याबाबत संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेत असतानाच तक्रार प्राप्त झाल्यास काळाबाजार करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी. कोरोनाबाधितरूग्णांकडून जादा बिलाची आकारणी होवू नये, सर्वांना माफक दरात आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासन आणि आपली यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याचे निर्देशित करून येत्या काळात कोरोनाचे संकट वाढेल असे गृहीत धरून संपूर्ण तयारी करावी. यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटरही तातडीने सुरू करावे, असे निर्देशित केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांना हॉस्पीटल उपलब्ध न होणे ही बाब उचीत नसून बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम 24×7 कार्यरत ठेवावी. या ठिकाणच्या दूरध्वनी क्रमांकाच्या हेल्पलाईन्स वाढवून घ्याव्यात. तसेच दररोज सकाळी सर्व लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील उपलब्ध बेड संदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी. यावेळी ग्रामीण रूग्णालयांच्या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा मांडला, यावर अशा ठिकाणी लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. त्या संदर्भात जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लॉकडाऊन संदर्भातील व्यापाऱ्यांची भूमिका राज्य सरकारला कळविण्यात येईल, असे सांगतानाच कोरोनाचे संकट महाभयंकर आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post