यावरच पुढचा सगळा खेळ असणार आहेसंपादकीय : 

लॉकडाऊन करायचा की नाही याचा गेला पंधरवडा ऊहापोह सुरू होता. मतमतांतरे येत होती. सूचनाही केल्या जात होत्या. नाराजीनाट्य आणि इशाऱ्यांचे खलितेही झालेत. अखेर आज त्याबाबत निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत शहराच्या आणि जिल्ह्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर विभागीय आयुक्‍तांनी त्या निर्णयांची माहिती दिली आहे.खरेतर हाही दिलासाच आहे. त्याचे कारण म्हणजे सरसकट सगळे बंद झालेले नाही. जे काही निर्बंध आले आहेत, ते अनावश्‍यक गोष्टींवर आले आहेत. तेही पुढच्या सात दिवसांसाठी घेण्यात आले असल्याचे आतातरी सांगितले जाते आहे. अर्थात हा करोना आहे.पंतप्रधानांनी, महाभारताचे युद्ध अठरा दिवसांत संपले होते. आपण करोनाचे युद्ध 21 दिवसांत संपवू असे म्हणून पहिला लॉकडाऊन जाहीर केला होता. पण वर्ष झाले तरी करोनाचे युद्ध संपलेले नाही. मध्यंतरी ते संपल्यासारखे वाटू लागले असताना आणि लसही हातात आली असताना दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली होती.

सुटकेचा नि:श्‍वास सोडण्याचाच काय तो वेळ गेला आणि परत सगळे हाताबाहेर गेले आहे. सरकार, प्रशासन आणि रुग्णालये, तेथील कर्मचारी त्यांचे काम तेव्हाही करत होते, आजही करत आहेत व करोनाचा पूर्ण बिमोड होईपर्यंत त्यांना ते करावेच लागणार आहे. त्यातून त्यांना उसंत मिळणार नाही अशीच स्थिती आहे. पण करोनाचा पॅटर्न समजून घेतला आणि थोडा युरोपातील बातम्यांचा कानोसा घेतला तर जेथे जेथे सगळे सुरळीत सुरू झाले आहे किंवा करण्याचा प्रयत्न केला आहे तेथे तेथे ढिलेपणामुळे पुन्हा सगळे गमावण्याची वेळ आली आहे. त्या विषाणूला थोपवणे हाच लस आली असली तरी एकमेव उपाय आहे. अगोदरही ते सांगण्यात आले होते. आजही तेच सांगावे लागते आहे.

लॉकडाऊनला लाख शिव्या घातल्या जात असतील आणि सरकारच्या नावाने बोटे मोडली जात असतील तरी स्वयंशिस्त हाच करोनाचा प्रसार थांबवण्याचा मंत्र असल्याच्या सत्याकडे दुर्लक्ष होत आहे. आताही जानेवारी महिन्यापासून रूग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात दिसू लागली होती. फेब्रुवारीत ते प्रमाण आणखी वाढले. मार्चमध्ये तर हाताबाहेर गेले आणि आता एप्रिलमध्ये पुन्हा गेल्या वेळेपेक्षाही भयावह अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे कारण संकटाला कमी लेखणे. पहिल्या लाटेच्या वेळी काही त्रुटी होत्या. सुविधा नव्हत्या. पूर्ण माहिती नव्हती. मात्र आता तसे नव्हते. सुविधा असल्या तरी रूग्णवाढ होऊ लागली की चांगली राष्ट्रे हतबल झाल्याचे आपण पाहिले.

आपल्याकडेही काय प्रकार झाले ते आपण पाहिले. मात्र दिवाळीत आणि त्यानंतरचे दोन महिने पाहिले तर येथे करोनाचा विषाणू आला होता व त्याने सगळे ठप्प करून टाकले होते असे सांगूनही कोणाचा विश्‍वास बसणार नाही इतका बिनधास्त कारभार सगळीकडे सुरू होता. प्रत्येक बाब सरकार आणि प्रशासन यांच्यावर टोलवताना नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आणि कर्तव्ये असतात याचे भान ठेवले गेले नाही. ज्या अर्थी टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जात होती त्याचा मतितार्थ समजून घेणे आवश्‍यक होते. प्रत्येकाने रोज काहीतरी नवी टूम काढायची आणि आंदोलने सुरू करायची असे प्रकार सर्रास घडले. मध्यंतरी निवडणुकाही झाल्यात. त्यात करोनाची सगळी आचारसंहिता खुंटीला टांगून ठेवण्यात आली.

लॉकडाऊन म्हणजे शेवटी काय आहे? जे सगळे तुम्हाला कळते, पण वळत नाही ते तुमच्यावर कायद्याने लादले जाते त्याला लॉकडाऊन म्हणतात. मुख्यमंत्री असतील अथवा आरोग्यमंत्री, जिल्ह्यांचे पालक मंत्री यांनी सगळ्यांनी संकट गडद होत चालले असल्यामुळे निर्बंधांचे सूतोवाच केले होते. लॉकडाऊनचा धसका घेतला असल्यामुळे त्या शब्दाला विरोध करण्यातच अनेकांनी धन्यता मानली. पण आपण काही निर्बंध आणि शिस्त स्वत:हून पाळली तर आपणच कोणताही बडगा उगारला न जाता सगळे नियंत्रित करू शकतो याचे समूहभान कुठेही दिसले नाही.

सार्वजनिक वाहने, सार्वजनिक ठिकाणे, खाऊगल्ल्या, हॉटेल्स, बार, मॉल एवढेच नव्हे तर गल्लीबोळातले चौक आणि मुख्य बाजारपेठांचे रस्ते सगळेच गजबजलेले होते. मास्क हा जबरदस्तीने लादलेल्या अलंकारासारखा केवळ चेहऱ्यावर कुठेतरी ओघळलेला असायचा. सोशल डिस्टन्स कधीच गुंडाळून ठेवलेले. ज्यांना लक्षणे दिसत होती किमान त्यांनी तरी खबरदारी घेत इतरांपासून लांब राहणे आवश्‍यक होते. त्यांनीही आपली लक्षणे आणि आपल्या घरात कोणीतरी पॉझिटिव्ह सापडला आहे या बाबी लपविण्यातच धन्यता मानली. ज्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते त्यांनी तर हद्दच केली. त्यांचे सगळे व्यवहार बिनबोभाट सुरू होते.

आपण पॉझिटिव्ह आहोत आणि आपल्यामुळे आपल्या कुटुंबासह सगळ्यांनाच त्रास होणार आहे याची मुळीच फिकीर न करता अनेकांनी त्यांचे दैनिंदन व्यवहार राजरोस सुरूच ठेवले. करोना म्हणजे साधा सर्दी खोकला झाला आहे या नव्या ज्ञानाची भर टाकणारेही महाभाग आजूबाजूला होतेच. त्यामुळे विषाणूची खिरापत सगळीकडे वाटत ठेवली गेली. मग लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्यावर पुन्हा निषेध सभा आणि खलिते सुरू झाले. आताही सुदैवाने सात दिवसांचेच निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यातही सगळेच बंद नाही. मात्र या सात दिवसांत स्थिती कशी आटोक्‍यात येते यावरच पुढचा सगळा खेळ असणार आहे.

Post a comment

0 Comments