पुणे : लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महापालिका मतदान केंद्रांचा आधार घेणार, परिणामी, लसीकरण वेगाने होईलपुणे - 
शहरातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महापालिका मतदान केंद्रांचा आधार घेणार आहे. या केंद्राची माहिती अक्षांश-रेखांशानुसार संकलित करून नंतर संबंधित केंद्राचा भाग 110 लसीकरण केंद्रांशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या भागातील केंद्रात जाऊन लस घेणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी सुमारे 3 हजार 500 मतदान केंद्राची माहिती संकलित केली जात आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून हे काम सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसांत स्मार्ट सिटी वॉर रूमच्या माध्यमातून मतदान केंद्र आणि लसीकरण केंद्र संलग्न केली जाणार आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे करोना रुग्णसंख्या नियंत्रित करतानाच दुसऱ्या बाजूला जास्त जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.सध्या महापालिकेची 110 लसीकरण केंद्र सुरू आहेत. आता 45 वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू आहे. शहरात या वयोगटाची सुमारे 14 ते 15 लाख लोकसंख्या आहे. यासाठी पालिकेने 210 केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र, त्यास मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आहे त्याच स्थितीत लसीकरण वेगावे व्हावे, यासाठी नियोजन सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शहरात सुमारे 3541 मतदान केंद्र महापालिकेने निश्‍चित केली आहे, सर्वसाधारणपणे एका केंद्रावर 700 ते 800 पर्यंत मतदारांची यादी असते. तसेच ते मतदार ठराविक भागातील असतात. त्यामुळे प्रत्येक केंद्रात येणारा भाग महापालिकेने निश्‍चित केलेल्या 110 पैकी जे लसीकरण केंद्र मतदान केंद्राच्या परिसरात असेल, त्याला संलग्न केले जाईल. त्यामुळे नागरिकांना आपल्या मतदान केंद्रासाठी कोणते लसीकरण केंद्र आहे हे माहिती होईल. यामुळे नागरिकांना आपले जवळचे केंद्र तर माहिती होईलच, शिवाय केंद्रावर गर्दी होणार नाही. जशी लसीकरण केंद्र वाढत जातील, तशी मतदान केंद्राची संलग्नता इतर केंद्रांना जोडली जाईल. परिणामी, लसीकरण वेगाने होईल.

Post a comment

0 Comments