सोसायट्यां मधील अनेक घरांतून कचरा दैनंदिन कचऱ्यातच येत असल्याने करोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची भीती



 पुणे - शहरात एकूण सक्रीय बाधितांमधील सुमारे 75 टक्‍क्‍यांवर रुग्ण घरीच विलगीकरणात (होम क्‍वारंटाइन) आहेत. मात्र, अनेक सोसायट्यांमध्ये खासगी कर्मचारी कचरा संकलन करत असतात. अनेक घरांतून हा कचरा दैनंदिन कचऱ्यातच येत असल्याने करोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेने सूचना देऊनही रुग्ण हा कचरा वेगळा देत नाहीत. त्यामुळे या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

शहरात करोनाने थैमान घातले आहे. मात्र, यात जवळपास 75 टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच उपचारासाठी मुभा देण्यात आली आहे. संबंधित रुग्णांनी त्यांचा दैनंदिन कचरा वेगळा देणे अपेक्षित आहे.करोनाचा कचरा देताना त्यावर सॅनिटयझर फवारून देणे अपेक्षित आहेत. कोणत्या घरात रुग्ण आहे, हे कचरा वेचकांना लक्षात यावे यासाठी पालिकेने या घरांवर लाल रंगाचे स्टिकर लावले आहेत.

ज्या इमारतीत 5 पेक्षा अधिक तसेच ज्या सोसायटीत 20 पेक्षा अधिक करोनाबाधित आहेत, त्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. त्यामुळे कचरा वेचकांना याची माहितीही असते. अनेक सोसायट्यांनी कचरा वेचण्यासाठी नेमलेले काही कर्मचारी अशिक्षित आहेत.

तर अनेकांनी घरावर लावलेले स्टिकर खोडून काढले आहेत. हे नागरिक वर्गीकरण न करता कचरा सुक्‍या कचऱ्यात टाकत आहेत. त्यामुळे हा संकलित होणारा कचरा दैनंदिन संकलन करणाऱ्या केंद्रावर येत आहे. त्यामुळे कचरा संकलन तसेच व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तर दिवसेंदिवस नवीन कंटेन्मेंट झोनची संख्या वाढतच असल्याने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनाही प्रत्येक घर तसेच सोसायटीच्या बाहेर फलक लावण्यास वेळ मिळत नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

सोसायटीत प्रसाराची भीती
अनेक करोना बाधित स्वत:चा कचरा वेगळा करत नाहीत. अथवा त्यावर सॅनिटायझर फवारत नाहीत. कचरा बकेटला लागलेल्या हातामुळे कचरा वेचकाच्या हातालाही करोनाचा विषाणू चिटकून त्याचा हात इतर बकेटमधून संकलन करताना इतर ठिकाणीही लागतो. परिणामी, सोसायटीतच हा कचरा पसरण्याची भीती आहे.

Post a Comment

Previous Post Next Post