पुन्हा टाळेबंदी होणार या धास्तीने असंघटित कामगार आणि लहान व्यावसायिक आता गावाकडे जाऊ लागले पिंपरी - करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा टाळेबंदी होणार या धास्तीने शहरातून पुन्हा एकदा पलायन सुरु झाले आहे. तर, राज्यातील सर्वच भागातून लोक उद्योगनगरीत पोट भरण्यासाठी आले आहेत. लहान-मोठा व्यवसाय करणारे, मिळेल ते काम करुन पोट भरणारे असंघटित कामगार आणि लहान व्यावसायिक आता गावाकडे जाऊ लागले आहेत. परराज्यातील तसेच मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांची मोठी संख्या आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसू लागली आहे. तर, तिकीट दरात सुद्धा वाढ बघायला मिळत आहे.

करोनाची दुसरी लाट राज्यात जोर धरत असतांना राज्यात व पुणे पिंपरी-चिंचवड शहरात टाळेबंदी पुन्हा होणार का?हे प्रश्‍न सामान्य नागरिकांना सतावत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात कामगार वर्ग़ मोठ्या संख्येने राहतो. यामध्ये राज्याच्या विविध भागातील व परराज्यातील नागरिकांची मोठी संख्या आहे. या चाकरमान्यांनी याचीच धास्ती धरत पिंपरी-चिंचवड शहरातून आपल्या गावी पलायन सुरु केले आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी संख्या अचानक वाढली आहे.

दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यात, टाळेबंदीची घोषणा कधी होईल याचा नेम नसल्याने नागरिकांनी मागील टाळेबंदीमध्ये जे हाल झाले ते होऊ नये, यासाठी तयारी सुरु केली आहे. यामुळे आपला गावच बरा म्हणत नागरिकांनी गावचा रस्ता धरल्याचे चित्र आहे.

Post a comment

0 Comments