राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी ..? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याही नावाची चर्चा सुरु मुंबई - राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांना या पदावर काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी प्रकृतीचे कारण देऊन त्यास नकार दिला होता. त्यांनी सोलापूरचे पालकमंत्रीपदही त्याच कारणामुळे सोडले असल्याचे सांगण्यात येते.

राज्यातील शरद पवार यांचे विश्‍वासू नेते म्हणून वळसे पाटील यांची ओळख आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये आजवर एकाही आरोपाचा डाग त्यांच्या राजकीय कारकिर्दीला लागलेला नाही.पक्षातील आणि सहकारी पक्षातील सर्व नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आणि न्यायी स्वभाव यांच्यामुळे हे पद वळसे पाटील यांच्याकडे सोपवले जाऊ शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

ते 1990 ला प्रथम काॅंग्रेसच्या उमेदवारीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर ते शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेले. शरद पवार यांचे मित्र आणि काॅंग्रेसचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांचे ते पुत्र होत. राष्ट्रावादी काॅंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना सुरुवातीला उर्जामंत्री पद देण्यात आले. ते कार्यक्षमपणे सांभाळल्यानंतर त्यांच्याकडे उच्च आणि वैद्यकीय शिक्षणाचा अधिभार सोपवण्यात आला होता. राज्याचे अर्थमंत्रीपदही त्यांनी भूषवले होते. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी त्या पदाला न्याय देण्याचे काम केले होते.

कोणत्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणात दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची धुरा सोपवले जाण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.

Post a comment

0 Comments