राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.



पुणे - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी राष्ट्रवादीतील 'क्‍लीन इमेज' असलेले आणि शरद पवार यांचे सर्वांत विश्‍वासू, प्रभावशाली व्यक्‍तीमत्व म्हणून ओळख असलेले पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍याचे आमदार तथा कामगार आणि उत्पादन शुक्‍ल विभागाचे मंत्री दिलीप वळसेपाटील यांची वर्णी लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. तरी शरद पवार यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारला बॅकफुटवर जावे लागले.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 21 मार्च रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत 22 मार्चपर्यंत देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा का, यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगत देशमुख यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले होते.

संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्याजागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसेपाटील यांना गृहमंत्री पद देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते, असे बोलले जात होते; पण केवळ राजकीय दबावामुळे देशमुखांवर आरोप झाले असून त्यांची चौकशी राज्य सरकार करणार असल्याने त्यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते देशमुखांच्या मागे खंबीरपणे उभे होते.

दरम्यान, सोमवारी (दि. 5) मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करावी, असे आदेश दिल्याने त्याअनुषंगाने गृहमंत्री पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने राजीनामा देत असल्याचे पत्र देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे आता गृहमंत्रीपदाची माळ राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार की, चौकशी पूर्ण हाईपर्यंत महाविकास आघाडी वेट अँड वॉच करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर नाव आहे ते दिलीप वळसे पाटील यांचेच.

Post a Comment

Previous Post Next Post