वाढत्या करोनामुळे लाॅकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता , ठाकरे यांना फोन करून सहकार्य करण्याची विनंती.



मुंबई - राज्यातील नवीन करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (ता. 03) एका दिवसात तब्बल 49 हजार 447 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 277 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाढत्या करोनामुळे लाॅकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना त्याबाबतचे संकेत दिले आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. त्याआधी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून सहकार्य करण्याची विनंती केल्याची माहिती आहे.

'राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं', अशी माहिती मनसे अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे.

भाजपसह मनसेनेही महाराष्ट्र लाॅकडाऊनला विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना फोन करून लाॅकडाऊनचा निर्णय झाल्यास सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु -

राज्यातील करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होत आहे. या बैठकीत लाॅकडाऊन की कठोर निर्बंधाचा निर्णय होईल याकडे सर्व राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता लाॅकडाऊनची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींशी संवाद साधून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post