मंत्रालयात सध्या आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यां व्यतिरिक्त बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदीमुंबई :
 राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे सध्याची परिस्थिती नाजूक बनली आहे. म्हणून मंत्रालयात सध्या आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यां व्यतिरिक्त बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आता मुंबईत असलेल्या आकाशवाणी या आमदार निवासांमध्येही अभ्यांगतांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसे परिपत्रक विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी काढले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल, म्हणून आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासामध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.राज्यात झपाट्याने सुरु असलेला कोरोनाच्या संसर्गाचा विचार करता दोन्ही आमदार निवासांमध्ये वास्तव्यास असलेल्या सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सदस्यांचे कार्यकर्ते, अभ्यांगत, तसेच मुंबईत औषधोपचारासाठी येणाऱ्यांना आमदार निवासात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यापुढे आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि एक अधिकृत स्वीय साहाय्य यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने याआधीच मंत्रालयात अभ्यांगत यांच्यासाठी प्रवेश बंदी केली आहे. तसेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंत्रालयातील कामकाजाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. तशा प्रत्येक विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्याचे कामकाज जिथून पार पाडले जाते त्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी कार्यालयीन वेळापत्रकात बदल करत, कामकाज दोन शिफ्टमध्ये चालणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता मंत्रालयात दोन शिफ्टऐवजी एक दिवसाआड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून आता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. मंत्रालयातील प्रत्येक विभागाच्या सचिवांनी कर्मचा-यांची विभागणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Post a comment

0 Comments