वृत्तपत्र विक्रेत्यांचे संघटक भाऊसाहेब सूर्यवंशी



इचलकरंजी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि मार्क्सवादी विचाराचे खंदे कार्यकर्ते भाऊसाहेब सूर्यवंशी  ६ एप्रिल २०२१ रोजी वार्धक्याने कालवश झाले. वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र व्यवसायातील एक महत्वाचा घटक असतो. भाऊसाहेबांनी या वृत्तपत्र विक्रेत्यांची संघटना इकजलकरंजी ते महाराष्ट्र राज्य पातळीवर बांधली.गावोगावी जाऊन , वृत्तपत्र विक्रेत्यांना भेटून ,चर्चा करून ,संघटनेचे महत्व पटवून देत संघटना उभारणीतील फार मोठे मौलिक योगदान दिले.वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि भाऊसाहेब हे एकजिनसी समीकरण होते. संघटनेची अधिवेशने घेऊन, न्याय्य मागण्या करून व त्या मंजूर करून घेऊन त्यांनी भरीव स्वरूपाचे योगदान दिले. एका अर्थाने वृत्तपत्र विक्रेता हा महत्वाचा पण दुर्लक्षित घटक.त्याला ओळख,स्थान व स्थैर्य देण्याचे प्रयत्न 

भाऊसाहेबांनी जाणीवपूर्वक केले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेप्रमाणे  त्यांनी यंत्रमाग कामगार ,असंघटित कामगार,शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी ,फेरीवाले अशा दुर्बल घटकांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या वैचारिक  मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब कार्यरत होते. मार्क्सवादी विचारधारेतूनच सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी ,संघटन व नियोजन त्या पद्धतीने असावे यासाठी भाऊसाहेब कायम आग्रही असत. संघटन ,संवाद संभाषण आणि प्रबोधन यासाठी ते कार्यरत होते. 'आहे रे ' वर्गासाठी ,त्याच्या संघटनेसाठी कार्यरत राहणे फारसे अवघड नसते. पण भाऊसाहेब उभे आयुष्य ' नाही रे 'वर्गाच्या उन्नतीसाठी मार्क्सवादावर निष्ठा ठेवून कार्यरत राहिले. गेली काही वर्षे आजारपण,अपघात, प्रकृतीच्या तक्रारी, हाता पायांची थरथर हे सगळे आघात सोबत असूनही भाऊसाहेब अखेरपर्यंत चळवळीत कार्यरत होते. सतत सात दशके कार्यरत असूनही भाऊसाहेब कधीच प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत.कारण तो त्यांचा स्वभाव नव्हता.कारण त्यांनी ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्या मनामनात व घराघरात ओळख निर्माण केली होती.ती कायमस्वरूपी राहणार आहे. त्यांचे काम आजच्या आर्थिक - सामाजिक विषमतेच्या प्रदूषणात फार महत्त्वाचे आहे.भाऊसाहेब सूर्यवंशी  यांच्या निधनाने शास्त्रीय समाजवादावर निष्ठा असणारा , दुर्लक्षित व पिचलेल्या समाजासाठी झटणारा एक बिनीचा कार्यकर्ता गेला आहे,विचारनिष्ठेला जीवननिष्ठा बनवून दशकानुदशके कार्यरत राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या वेगाने कमी होत असताना भाऊसाहेबांचे कालवश होणे ही मोठी हानी आहे.


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९० )

Post a Comment

Previous Post Next Post