आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पुढाकार घेऊन 10 रिक्षा देऊन लसीकरणाची जनजागृती करण्याचा निर्णय






 इचलकरंजी : कोरोनाला रोखण्यासाठी शहरवासियांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे*यांनी पुढाकार घेऊन 10 रिक्षा देऊन लसीकरणाची जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासन निर्देशांचे काटेकोरपालन करण्यासह आवश्यक उपाययोजना संदर्भात  इचलकरंजी नगरपरिषदेच्या सभागृहात शहर सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये शासन निर्देशांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासह प्रसंगी कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे शहरासाठी धोकादायक असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी शहरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता दुसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण हा राजकारणाचा नव्हे तर आरोग्याचा विषय आहे. त्यामुळे जनजागृतीसह कठोर कारवाईची पाऊले उचलणे गरजेचे आहे. जोपर्यंत कोरोनासंदर्भात गांभिर्य शहरवासियांच्या मनात बिंबत नाही तोपर्यंत कोणताच रिझल्ट मिळणार नाही. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जर शहरातील झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला तर कठीण परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करुया.


शासनाने उद्योग बंद न करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पण त्याचा गैरफायदा घेऊन कामाच्या नांवाखाली कोणीही शहरातून फिरु नये. त्याचबरोबर एखाद्या कामगाराला कोरोनाची लागण झाली तर त्याला संस्थात्मक अलगीकरण करण्याची जबाबदारी मालकावर सोपवावी. सर्वच क्षेत्रातील ज्या कामगाराने तपासणी केलेली नाही अथवा लस घेतलेली नाही त्याला कामावर घेऊ नका. शहरात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह पूर्वीचे सहा आणि नवीन सहा अशी 13 लसीकरण केंद्रे सुरु आहेत. गरज भासल्यास आणखीन केंद्र वाढवता येतील. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता स्वत:हून जावून लस घ्यावी. लसीकरण हे सक्तीचे करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शासन निर्देशांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करा. विनामास्क फिरणार्‍यांना शिक्षा आणि दंड करा.


भाजीविक्रेत्यांनी एकाच ठिकाणी न बसता हातगाड्यांद्वारे गल्लोगल्ली, भागाभागात फिरुन विक्री करावी. त्याचबरोबर नगरपरिषद प्रशासनाने 14 व्या वित्त आयोगातील शिल्लक असलेली रक्कम आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार्‍या दंडात्मक कारवाईतील रक्कम कोरोनाला थोपविण्यासाठी वापरावी. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करुन एकजुटीने प्रयत्न केल्यास आपण कोरोनाला निश्‍चितपणे रोखू असा विश्‍वास आमदार आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी विकास खरात, पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी, मुख्याधिकारी शरद पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील, पाणीपुरवठा सभापती दीपक सूर्वे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, अजितमामा जाधव, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार,  डॉ. महाडीक, सुनिल पाटील, प्रकाश मोरबाळे, महादेव गौड यांच्यासह तिन्ही पोलिस ठाण्याचे निरिक्षक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post