अठरावा स्मृतिदिन स्नेह संगीत प्रतिज्ञा संस्थेच्या वतीने आणि गझलसादच्या सहकार्याने ' गझलसाद ' हा सुरेश भट यांच्या कविता सादर व आठवणींचा जागर करून साजरा करण्यात आला



कोल्हापूर ता. १५ ,आज समाजाला माणसांच्या कवितेची खरी गरज आहे.झाडे बेरोजगार होत नसतात. पाखरांसमोर महागाईचा प्रश्न नसतो. एखाद्या जातीय दंग्यात भर रस्त्यावर एखादे झाड कापले गेल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. कविता हा माणुसकीच्या विजयासाठी सुरू असलेल्या सनातन संघर्षाचा अविभाज्य भाग आहे.माणसा विषयीचे प्रेम हे सर्वोच्च आहे.प्रेमाशिवाय माणुसकीला अर्थ नसल्यामुळे मी प्रेम कविता लिहिणाऱ्यांना प्रतिगामी समजत नाही. जगण्यापासून कवितेला दूर ठेवता येत नसते आणि कवितेतून जगणे वगळता येत नसते, अशी काव्यविषयक भूमिका मांडणाऱ्या कविवर्य सुरेश भट यांचा अठरावा स्मृतिदिन स्नेह संगीत प्रतिज्ञा संस्थेच्या वतीने आणि गझलसादच्या सहकार्याने ' गझलसाद ' हा सुरेश भट यांच्या कविता सादर व आठवणींचा जागर करून साजरा करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ गझलकार  श्रीराम पचिंद्रे, प्रा. नरहर कुलकर्णी ,युवराज यादव आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.  प्रतिज्ञा संस्थेचे प्रशांत जोशी यांनी या मैफलीचे उत्तम आयोजन केले होते.आणि त्याचे ऑनलाइन पद्धतीने प्रसारण केले.

या 'गझलसाद' मैफलीत श्रीराम पचिंद्रे यांनी सुरेश भट यांच्या मागता न आले म्हणून राहिलो भिकारी, एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो आदी रचना सादर केल्या आणि सुरेश भटांच्या आठवणीही सांगितल्या. प्रा. नरहर कुलकर्णी यांनी फसवून मी स्वतःला फसवायचे किती ?,  त्या फुलांनी छेडीली रानात गाणी, तुला हवा तसा आणू कुठून चेहरा  आदी रचना स्वतः संगीतबद्ध करून सादर केल्या आणि भटांचे किस्से सांगितले.

युवराज यादव यांनी नाही म्हणावयाला आता असे करु या, इतकेच मला जातांना सरणावर कळले होते ,तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका आदी रचना सादर केल्या आणि भटांच्या आठवणी सांगितल्या. प्रसाद कुलकर्णी यांनी शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला, अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही, आले रडू तरीही कुणी रडू नये  आदी रचना सादर केल्या.आणि भटांच्या आठवणींचा जागर केला.तसेच या मैफलीचे बहारदार सूत्रसंचालनही केले.कविवर्य सुरेश भट यांना त्यांच्या कविता,गीते,गझला ,पत्रलेखन ,स्नेहसंवाद, आठवणी या आधारे प्रतिज्ञा व गझलसाद च्या वतीने वाहिलेली आदरांजली रसिकांना अतिशय भावली.

Post a Comment

Previous Post Next Post