भटांचा वसा आणि वारसा पुढे नेणारी प्रा.सुनंदा पाटील माझी गझल हमसफर आहे : गझलनवाज पं.भीमराव पांचाळे यांचे प्रतिपादन



मुंबई ता. ८ जे मनातून येते तेच कागदावर नेमकेपणाने उतरविणाऱ्या प्रा.सुनंदा पाटील हे मराठी गझल लेखनातील एक महत्वाचे नाव आहे. सुरेश भट यांनी लावलेल्या गझलेच्या  अमृताच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.त्या वटवृक्षाची एक महत्वाची फांदी म्हणून सुनंदा पाटील यांच्या गझलेकडे पहावे लागेल. त्या गझल चळवळीतील गेल्या तीन दशकांहून अधिक काळ माझ्या हमसफर आहेत असे मत पं.गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केले.ते सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांच्या ' सावली अंबराची ' या गझलसंग्रहाचे ओंनलाईन प्रकाशन करतांना बोलत होते. भीमरावजी पांचाळे यांच्या हस्ते या गझलसंग्रहाचे लोकार्पण  करण्यात आले.भीमराव पांचाळे यांनी यावेळी सुनंदा पाटील यांच्या  गझलेतील शेर आपल्या अप्रतिम स्वरातपेश केले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त शेफ व कवी - रसिक विष्णु मनोहर आणि ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रारंभी लोकव्रत प्रकाशनचे शिरीष कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि पुस्तक परिचयकरून दिला.


विष्णू मनोहर यांनी यावेळी सुरेश भट यांच्याशी असलेले ऋणानुबंध ,त्यांच्या घरी झालेले मुशायरे,त्यात सुनंदा पाटील यांच्या गझलांना मिळणारी दाद या साऱ्या आठवणी उलगडून सांगितल्या .गझलनंदा यांचे काही शेरही सादर केले.गझला ऐकून रसिक तृप्त व्हायचे व जेवण दुर्लक्षित व्हायच अशी मार्मिक दादही त्यांनी दिली.सावली अंबराची ' हा गझल संग्रह (ईबुक) स्वरूपात  अँमेझॉनवर उपलब्ध आहे.रसिकांनी तो घ्यावा व इतरांनाही द्यावा असे आवाहनही विष्णू मनोहर यांनी केले.

प्रसाद कुलकर्णी यांनी सुनंदा पाटील यांच्या गझलेखनाचा सविस्तर आढावा घेतला व त्याची वैशिष्टये स्पष्ट केली.

मानवी जीवनात अनादी काळापासून महिलांनी सर्व क्षेत्रात आपले अनमोल योगदान दिले आहे. सृजनशीलता हा स्त्रीत्वाचा स्थायीभाव आहे. विज्ञाना पासून उद्योगापर्यन्त आणि राजकारणापासून कलाक्षेत्रापर्यन्त सर्व क्षेत्रात स्त्री उद्गार महत्वाचा ठरला आहे. मराठी गझलविश्व ही अनेक महिला गझलकारांनी समृद्ध केलेले आहे. त्यातील एक अग्रक्रमी नाव म्हणजे प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा.मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेशभट उर्फ दादांच्या गझल घराण्याशी व वसा आणि वारश्याशी नाळ सांगणारा  मराठी गझलेतील हा एक महत्वाचा स्त्री उद्गार आहे असे सांगत प्रसाद कुलकर्णी यांनी सुनंदा पाटील यांच्या अनेक शेरांची  उदाहरणे दिली.आणि नऊ रसात भिजलेली ही सशक्त व सकारात्मक गझल आहे हे अधोरेखित केले.

यावेळी प्रा.सुनंदा पाटील यांची गझललेखन वाटचाल समजावून सांगणारी मुलाखतही घेण्यात आली.जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 'सावली अंबराची 'या गझलसंग्रहाचा लोकार्पण सोहळा लोकव्रत प्रकाशन व जनमंगल साप्ताहिक यांच्या सर्व समूहाने  ऑनलाईन पद्धतीने कमालीच्या उत्तमतेने आयोजित केला होता. सव्वा दोन तास अतिशय रंगतदार असा सोहळा झाला. भैरवी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . श्रेया , बोरगावकर ,मानसी घारपुरे यांनी स्वागत केले. वैष्णवी बोरगावकर व श्रेया सरनाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला., रश्मी पदवाड मदनकर,गायत्री मुळे यांनी संपूर्ण लोकव्रत व जनमंगल समूहाने कार्यक्रम यशस्वी केला.







 .

Post a Comment

Previous Post Next Post