दारूच्या नशेत चैनीसाठी खुनाचा १८ दिवसांनी उलगडा,तिघे ताब्यात

  

  हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले          

  शांतीनगर परिसरात असणाऱ्या कत्तलखान्यानजिकच्या मोकळ्या जागेत एका युवकाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेतील मृतदेह २४ फेब्रुवारी रोजी आढळुन आला होता.सदर खुनाचा तपास करणे आव्हानात्मक बनल्याने घटनास्थळी जिल्हापोलिस प्रमुखांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाने सहा तपास पथके स्थापन करण्यात आली होती. वेगवेगळ्या माध्यमातून व्हिडीओ प्रसारित करून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील पथकाने सातत्याने तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे अक्षय रावसाहेब कमतनुरे वय २२,शक्ती शहाजी इंगळे वय २४,तेजस उर्फ सुशांत राजु गोरे वय १९ सर्व राहणार कृष्णानगर शहापूर यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.दारू पिण्याच्या बहाण्याने मोकळ्या जागेत नेऊन तिघा आरोपींनी खिशातून पैसे काढून घेण्याच्या उद्देशाने झालेल्या झटापटीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी प्राथमिक तपासात दिली आहे.सदर गुन्ह्याच्या तपासात व आरोपीना ताब्यात घेण्यात सुनील पाटील,मोहसीन पठाण,सागर हारगुले,सुहास शिंदे यांना यश आले असून जिल्हापोलिस प्रमुखांनी सदर कामगिरीसाठी सदर पथकाला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.पत्रकार परिषदेस इचलकरंजी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post