सत्य हाच ईश्वर मानणारे गांधीजी सार्वकालिक मार्गदर्शक : प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
विटा ता.४, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे कालातीत व्यक्तिमत्व होते.गांधीविचार हे एक जीवन विषयक व्यापक तत्वज्ञान आहे.ईश्वर सत्य है पासून सत्य हाच ईश्वर आहे या विचारांवर गांधीजी आले याचे कारण त्यांना समाजातील शेवटच्या माणसाचा चेहऱ्यावरची चिंता,भय दूर करायचे होते.आजच्या हिंसात्मक अस्वस्थ वर्तमानात गांधीजींच्या विचारांचे महत्व सर्व जगाला पटले आहे.त्यामुळे वैश्विकदृष्ट्या गांधी विचारांचा समकालीन संदर्भ अतिशय महत्वाचा आहे.सर्वांगीण समता प्रस्थापित करायची असेल तर गांधीजीना पर्याय नाही ,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत महाविद्यालय विटाच्या अर्थशास्त्र विभाग व गांधीयन थॉट कोर्सच्या वतीने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ' गांधी विचारांचे समकालीन महत्व ' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.या चर्चासत्रात प्रा.डॉ.एस.एम.भोसले ( सातारा ) हेही प्रमुख वक्ते होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.एस.मोरे होते.स्वागत,प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.जे.एस.इंगळे यांनी करून दिला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,गांधीजी विषमतेच्या शृंखला तोडून नवे समतावादी,सत्यवादी,अहिंसावादी  विश्व निर्माण  करू पाहणारे जगन्मान्य विचारवंत नेते होते.ते मूव्हमेंटवादी होते इव्हेंटवादी नव्हे.आपल्या अहिंसाविचारावर आधारित आंदोलनांनी त्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका येथे लढा दिला.आणि वर्णवर्चस्व आणि साम्राज्यवाद याना पराभूत केले.आज गांधीजींना सोयीनुसार वापरायचा व सोयीनुसार दूर करायचा काळ सोकावला आहे.त्यालाही गांधीमार्गानेच ताळ्यावर आणावे लागेल.गांधीजींना भ्याडपणाने शरीराने नष्ट केले तरी गांधीजी अमर आहेत.कारण ते सार्वकालिक समाजाच्या उपयोगाचे आहेत.आपल्या भाषणात प्रसाद कुलकर्णी यांनी गांधीवादाचे समकालीन महत्व विस्तृतपणे अधोरेखित केले.दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ.एस.एम.भोसले यांनीही गांधी विचारांचे आजच्या संदर्भातील महत्व अभ्यासपूर्णपणे मांडले.प्राचार्य डॉ.आर.एस.मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.या वेबिनरमध्ये प्राध्यापक, अभ्यासक,कार्यकर्ते , विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रा.पी.टी.गांजवे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.एस.एच.कोकरे यांनी आभार मानले.

Post a comment

0 Comments