सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील भोंगळ व आंधळा कारभार पुन्हा उघडकीस , मृत झालेल्या महिलेऐवजी एका पुरुषाचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.



सांगली:. सांगली शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील भोंगळ व आंधळा कारभार शनिवारी पहाटे पुन्हा उघडकीस आला. मृत झालेल्या महिलेऐवजी एका पुरुषाचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. नातेवाईक कर्नाटकात निघाले होते. निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर मृतदेह दुसराच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईक पुन्हा सांगलीत आले. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.

कर्नाटकातील एका महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या विभागातील कर्मचार्‍यांनी नातेवाईकांना त्याची कल्पना दिली.त्यांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकही तो मृतदेह घेऊन रूग्णवाहिकेतून गावी निघाले होते. इचलकरंजी फाटा येथे गेल्यानंतर वार्‍याने मृतदेहाच्या चेहर्‍यावरील कापड दूर झाले. शेजारीच बसलेल्या महिलेने आरडाओरडा सुरू केला. रूग्णवाहिका चालकाने त्याबाबत विचारल्यानंतर महिलेने दुसर्‍याच पुरूषाचा मृतदेह दिल्याचे चालकाला सांगितले. त्यानंतर तो मृतदेह घेऊन नातेवाईक पुन्हा सांगलीत आले.

इस्पितळात नातेवाईकांनी प्रशासनाला जाब विचारला. अतिदक्षता विभागातील कर्मचार्‍यांनी त्यांची समजूत काढली त्यांना नातेवाईक महिलेचा मृतदेह सुपूर्त केला. नातेवाईक तो घेऊन कर्नाटकात निघून गेले.भल्या पहाटे नातेवाईकांनी घातलेल्या गोंधळामुळे सिव्हील परिसरात गर्दी झाली होती.अतिदक्षता विभागातील कर्मचार्‍यांकडून वारंवार अशा चुका होत असल्याने सिव्हील प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांसह, रूग्णवाहिका चालकांकडून केली जात आहे.

संबंधितांवर कारवाई करा ः साखळकर

सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार झाला आहे. त्यामुळे यामध्ये दोषी असणारे कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post