हेमंत रासने यांनी अध्यक्षपदाची 'हॅट्ट्रिक' साजरी केली



 पुणे - महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवत हेमंत रासने यांनी अध्यक्षपदाची 'हॅट्ट्रिक' साजरी केली आहे. भाजपचे 99 नगरसेवक असतानाही रासने यांना ही संधी मिळाली. शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रासने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुनील गायकवाड यांचा 10 विरोधात 6 मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

भाजपने 2017 मध्ये योगेश मुळीक, दुसऱ्या वर्षात सुनील कांबळे यांना समितीचे अध्यक्षपद दिले.मात्र 2019 मध्ये कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून सुनील कांबळे आमदार झाल्याने पक्षाने जानेवारी 2020 मध्ये स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी रासने यांना तीन महिन्यांसाठी मिळाली. त्यानंतर त्यांना 2020-21 चे अंदाजपत्रक मांडण्याची संधी मिळाली. मात्र, हे अंदाजपत्रक लागू होण्याच्या अवघ्या आठवडाभर आधीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर जवळपास आठ महिने विकासकामे आणि उत्पन्नही घटले होते. या कालावधीत रासने यांनी मिळकतकर वसुलीसाठी विशेष भर देत अभय योजना तसेच प्रशासनास वेळोवेळी सूचना केल्याने महापालिकेने विक्रमी 1,400 कोटींचा महसूल मिळवला आहे.

परिणामी, पुणे महापालिका राज्यात सर्वाधिक महसूल मिळवणारी पालिका ठरली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा एकदा स्थायी समितीची संधी दिली असून, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रासने यांच्याकडे शहर विकासाची आणि अंदाजपत्रकाच्या परिणामकारक अंमलबजावणीची जबाबदारी असणार आहे. निवडणुकीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बिडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हेमंत रासने यांचे अभिनंदन केले.

शहरात उत्पन्नवाढ तसेच विकासाची मोठी संधी आहे. त्याचा योग्य आणि परिणामकारक वापर करत जगातील पहिल्या दहा शहारांत पुण्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहराच्या विकासात राजकारण न आणता सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन अंदाजपत्रकाची परिणामकारक अंमलबजावणी, महापालिकेचा महसूल वाढवणे तसेच पुणेकरांसाठी जास्तीत जास्त योजना मार्गी लावणे याला प्राधान्य आहे.
- हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष, मनपा पुणे

Post a Comment

Previous Post Next Post