पुढील काळात लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाण्याचे हद्दीतील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहावा याकरिता पुणे पॅटर्न राबवून मोक्का कायद्यांतर्गत शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार... शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता




 पुणे :  - लोणी काळभोर व लोणीकंद ही ग्रामीण भागातील पोलीस ठाणी शहर पोलीस आयुक्तालयास जोडले असल्याने या या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाणे परिसराची पाहणी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले होते. मोक्का कायद्यांतर्गत शहरात पुणे पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर यापूर्वीच कारवाई केली आहे. बहुतांश टोळ्यांवर प्रभावीपणे मोक्का लावल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. याचप्रमाणे पुढील काळात लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाण्याचे हद्दीतील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहावा याकरिता पुणे पॅटर्न राबवून मोक्का कायद्यांतर्गत शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अमिताभ गुप्ता बोलताना म्हणाले, बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य सरकारने दमदार पावले उचलली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश हा कायदा संपूर्ण राज्यात लागू केला. या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद केलेली असून पुढच्या काळात ग्रामीण भागात बेकायदा खाजगी सावकारकी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गरज पडली तर तडीपार आणि मोक्का यांसारख्या गुन्ह्यांची नोंद केली जाईल. यासह दारू, मटका, जुगार तसेच वाळूमाफियांसोबत इतर अवैध धंदे करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. परंतु लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील. यामुळे सर्वसामान्य लोंकाच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याद्वारे गुन्हे व अन्य प्रशासकीय माहिती घेऊन त्वरित या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत कशाप्रकारे स्पष्टपणे कार्य करता येईल यासाठी अधिक मनुष्यबळ वाढवण्यात येणार असून, त्यामुळे गस्त वाढवून आवश्यक वेळी तात्काळ मदत मिळेल याकरिता आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. अशी ग्वाही आयुक्त गुप्ता यांनी दिली आहे.

दरम्यान, पुणे- सोलापूर व पुणे नगर या दोन्ही महामार्गावरील वाढती वाहतूक त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येसाठी कायदा, सुव्यवस्था सांभाळणे यांस आम्ही प्राधान्य देणार आहोत. असेही गुप्ता यांनी म्हटले आहे. यावेळी या पत्रकार परिषदेला सहआयुक्त रविंद्र शिसवे, पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडल ५ पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर व दगडू हाके उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post