पुणे : शहरातील अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात शहर पोलिसांना यश



 पुणे : शहरातील अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातील एका फ्लॅटमध्ये कारवार्इ करीत सहा परदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ६८ लाख ८६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक आरोपींमध्ये एक महिलेचा देखील समावेश आहे. आरोपींकडून १३६ ग्रॅम ८०० मिलीग्रॅम वजनाचे व ९ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीचे कोकेन आणि एक किलो १५१ ग्रॅम वजनाचे व ५७ लाख ५५ हजार रुपये किमतीचे मॅफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून ५४ हजार रुपये रोख, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, प्लास्टिक पिशव्या असा १ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.मनफ्रेड दाऊद मंन्डा (वय ३०), अनास्टाझिया डेव्हिड (वय २६), बेका हसीम फॉऊमी (वय ४२), हसन अली काशीद (वय ३२, सर्व रा. टांझानिया), शामिन नंन्दावुला (वय ३०) आणि पर्सी नार्इगा (वय २५, दोघेही रा. युगांडा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकातील पोलिस नाईक मनोज साळुंके यांना माहिती मिळाली होती की, पाच ते सहा परदेशी नागरिक उंड्रीत एका घरात कोकेन आणि एमडी विकत आहेत. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली. माहितीची खात्री पटल्यानंतर अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे आणि सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड, सहायक निरिक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलिस अंमलदार प्रवीण शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, पांडुरंग पवार, रूबी अब्राहम, मनोज साळुंके, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, विशाल दळवी, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी ही कारवार्इ केली. या गुन्ह्याचा तपास पथकाचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहेत.

अटक करण्यात आलेले परदेशी नागरिक विद्यार्थी, व्यवसाय आणि वैद्यकीय व्हिसावर शहरात राहत होते. शहरातील विविध भागात हे अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आली.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर

Post a Comment

Previous Post Next Post