आपल्या जागेवर महिला आरक्षण पडल्यास तिकिटाची अडचण नको, म्हणून नगरसेवकांनी आपल्या होम मिनिस्टरला मैदानात उतरवले आहे



 पुणे - महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आपल्या जागेवर महिला आरक्षण पडल्यास तिकिटाची अडचण नको, म्हणून नगरसेवकांनी आपल्या होम मिनिस्टरला मैदानात उतरवले आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला प्रभागात काही ना काही कार्यक्रम मतदारांसाठी घेण्यात येत आहेत. त्याचे संयोजक म्हणून नगरसेवक त्यांच्या पत्नीचे नाव समोर करत आहेत.

जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील. मागील निवडणुका चारच्या प्रभाग रचनेसह झाल्या होत्या. तर या निवडणुका 2 सदस्यांचे वॉर्ड करून होण्याची चिन्हे आहेत. त्यातही प्रत्येक प्रभागात 50 टक्के महिला आरक्षणामुळे एक वॉर्ड महिलांसाठी राखीव असणार आहे.त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना या महिला आरक्षणाची भीती आहे.

राजकीय अस्तित्त्व टिकवण्यासाठी आपल्याच घरातील महिलेला तिकीट मिळावे, यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू झाली आहे. या महिला उमेदवाराचा बायोडेटा स्ट्रॉंग असावा, मतदारांमध्ये त्यांची ओळख वाढावी तसेच त्यांचे सामाजिक काम दिसावे यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.

सध्या काही नगरसेवक त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत प्रभागात विकासकामांचे उद्‌घाटन, महिला मेळावे, हळदी-कुंकू कार्यक्रम, महिलांसंदर्भातील तक्रारी सोडवणे असे उपक्रम राबवत आहेत. काही प्रभागांतील गल्ली-बोळांत नगरसेवकांनी पत्नीच्या नावाने मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍सबाजी केली आहे.

नेते झाले छोटे
पालिका निवडणुकांच्या तोंडावर पत्नीचा संभाव्य उमेदवार म्हणून प्रचार सुरू करणाऱ्या या नगरसेवकांनी गेली चार वर्षे प्रभागात तसेच सोशल मीडियात झळकवणाऱ्या फोटो आणि फ्लेक्‍सवर आपल्या पक्षाच्या केंद्र, राज्य तसेच स्थानिक नेत्यांचे फोटो मोठ्या आकारात लावले होते. मात्र, आता या मोठ्या फोटोची जागा या नगरसेवकांच्या घर कारभारणीने घेतली असून, नेत्यांचे फोटो छोटे झाले आहेत. त्यामुळे वॉर्डात पुरूष अथवा महिला कोणतेही आरक्षण पडो तिकीट आपल्याच घरात येण्यासाठी लोकप्रतिनिधींची सुरू असलेली धडपड चर्चेचा विषय झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post