महापालिकेची 37 नागरी सुविधा केंद्रे जवळपास बंदच असून, काही पूर्ण क्षमतेने सुरूच नसल्याने नागरिकांची होती मोठी गैरसोय



पुणे - गेल्या वर्षभरापासून शहरातील महापालिकेची 37 नागरी सुविधा केंद्रे जवळपास बंदच असून, काही पूर्ण क्षमतेने सुरूच नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या केंद्रातील कामे करण्यासाठी एजन्सी नेमण्याची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने मनुष्यबळही भरत येत नाही; त्यामुळे खोळंबा होत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे.

या केंद्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने मिळकत कर भरणे, जन्म मृत्यूचे दाखले मिळविणे आदी कामांसाठी नागरिक क्षेत्रीय कार्यालयात गर्दी करत आहेत. कर संकलन, जन्म मृत्यू दाखले, झोन दाखले आदी सेवा महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात देण्यात येतात.ही केंद्रे चालवण्यासाठी महापालिकेने एजन्सी नेमली होती. गेल्या वर्षी जानेवारी अखेरीस या एजन्सीची मुदत संपली.

त्यानंतर प्रशासनाने एजन्सीला महिनाभर मुदतवाढ दिली. लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर नागरी सुविधा केंद्रात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या सेवांसाठी नागरिक महापालिकेत गर्दी करू लागले. त्यावर प्रशासनाने या केंद्रात महापालिकेचे कर्मचारी नेमून तेथील कामकाज तात्पुरत्या स्वरूपात सुरू ठेवले. त्यानंतर ऑगस्टमध्ये या केंद्रांतील कामांसाठी एजन्सी नेमण्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा काढल्या. त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याने फेर निविदा काढण्यात आल्या. परंतु, तिही प्रक्रिया 'लॅप्स' होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची मात्र फरफट होत आहे.

महापालिकेचे नागरी सुविधा केंद्र चालवण्यासाठी मनुष्यबळ 'आऊटसोर्स' करण्याच्या निविदा प्रक्रियेस स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यासाठी लवकरच कार्यादेश काढण्यात येतील आणि पुढील आठवड्यापासून ही केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील.
- राहुल जगताप, प्रमुख, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, मनपा.

Post a Comment

Previous Post Next Post