वाहतूक विभागात जप्त केलेली वाहने धुळखात .
पुणे - डेक्‍कन येथे जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याचा प्रकार आठवडाभरापूर्वी घडला. मात्र, या घटनेनंतरही शहरातील विविध पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाच्या आवारात जप्त वाहने धुळखात पडून आहेत. त्यामुळे डेक्‍कन येथील आगीच्या पार्श्‍वभूमीवर मागील अनेक वर्षांपासून उभी असणाऱ्या वाहनांबाबत कार्यवाहीबाबत नागरिकांकडून सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून विविध गुन्ह्यांत समाविष्ट असणारी वाहने, जप्त केलेली वाहने, बेवारस वाहने, अपघातातील वाहने पोलीस स्थानकांच्या बाहेर ठेवण्यात येतात. याशिवाय, नो-पार्किंगसह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहनेदेखील जप्त करण्यात येतात.त्यापैकी काही वाहनमालक रितसर प्रक्रिया पूर्ण करून ती सोडवून नेतात. मात्र, काहींकडून दुर्लक्ष केल्याने वाहने पोलीस स्थानकांच्या बाहेर पडून राहतात. याशिवाय नदीपात्र, फारशी वर्दळ नसणारे रस्ते, उड्डाणपुलांखालील रिकामी जागा बेवारस वाहनांसाठी पार्किंग ठरत आहे.

मागील आठवड्यात डेक्‍कन येथील पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लागली होती. यात सुमारे 35 ते 40 वाहनांचे नुकसान झाले. मात्र, या धर्तीवर पोलीस स्टेशनसह विविध ठिकाणी उभ्या असणाऱ्या बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील मामलेदार कचेरीच्या मागील मैदानासह स्वारगेट, भारती विद्यापीठ आदी पोलीस ठाण्यांचे परिसरात शेकडो वाहने उभी केलेली आहेत. यासह वाहतूक विभागाचे आवारासह त्याभागातील रस्त्यांवर जप्त वाहने उभी आहेत. त्यामुळे या वाहनांबाबत ठोस कार्यवाही केव्हा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

वाहतूक विभागांजवळील रस्त्यांवर पार्किंग
वाहतूक विभागांकडे अपुरी जागा असल्याने वाहतूक नियमभंगात जप्त केलेली वाहने रस्त्यावर उभी केली जातात. याशिवाय, काहीवेळा 'नो-पार्किंग'च्या नियमांतर्गत जप्त केलेली वाहने 'नो-पार्किंग'मध्ये उभी करण्यात येत असल्याने नागरिकांकडून याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने बाजूला करण्याचा वाहतूक विभागाचा प्रयत्न असतो. वाहतूक विभागाकडून जप्त वाहनांना 'अनअटेंडेड'ची नोटीस देण्यात येते. याशिवाय, वाहनांबाबत कोर्टाची कायदेशीर प्रक्रिया आणि महापालिका अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने कार्यवाही करण्यात येते.

वाहतूक विभागाच्या वतीने ताब्यात घेतलेली वाहने व्यवस्थित उभी केली जातात. ज्या वाहतूक कार्यालयाकडे वाहने उभी करण्यासाठी जागा नसते त्यांच्याकडून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही यादृष्टीकोनातून वाहने उभी केली जातात.
- राहुल श्रीरामे, उपायुक्‍त, वाहतूक शाखा

Post a comment

0 Comments