आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार , जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष ..मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा 9 हजार 500 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता.

कोरोनाचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्याने त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a comment

0 Comments