कडक निर्बंध की लॉकडाऊन ? आज मुख्यमंत्री घेणार निर्णय



 मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. लस आल्यामुळे कोरोना गेल्याचा लोकांमध्ये गैरसमज वाढला आहे. त्यातच सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोनाच्या  वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल असे म्हटले होते. आज याच मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेतराज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियामांचे पालन नागरिकांना करावे लागेल.

कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील. कोरोना बाधित रुग्णसंख्ये मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

राज्यात आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post