सलीम शेख याचं असणं का महत्वाचं होतं?हा माणूस माझ्या खूप काही संपर्कात नव्हता. अनेक स्वप्नाळू कार्यकर्ते यांच्याविषयी भरभरून बोलायचे. त्यावेळी कुतूहल वाटायचे. नंतर काही महत्वाच्या कार्यकर्त्यांकडून सलिमभाईंची  माहिती  मिळाली. या एकट्या माणासाने कुरआनच्या  हजारो प्रती लोकांना दिल्या. त्याविषयीच्या गैरसमजांवर हा माणूस भरभरून बोलायचा. क्षणाक्षणाला आधुनिक होणाऱ्या जगात हा माणूस त्या अर्थाने साक्षर असूनही आधुनिकतेचा  टेंभा  मिरवणाऱ्यांसाठी खूप मागास वाटायचा. पण काम करायाची जिद्द टेक्नोसेव्ही असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही लाजवणारी होती.  माहिती आधिकाराचा वापर कसा होतोय ते सांगायला नको. पण सलिमभाईंनी या कायद्याचा वापर करुन अनेक मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांची माहिती जमवली. या विषयात खूप काही करायची त्यांची हौस मला महत्वाची वाटली. त्या पुस्तकाचा दर्जा सुधारावा म्हणून मी एक-दोनदा त्यांना बोललोही. त्यांनी फार काही मनाला लावून घेतलं असेल असं वाटत नाही. जर त्यांना वाईट वाटलं असेल तर मी त्यांना आता सॉरीही म्हणू शकणार नाही. 

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातल्या  भेटीनंतर हे महाशय थोड्या बहुत संपर्कात आले. मी ‘इस्लामच्या प्रचारकांची बौध्दीक उधारी’ हे स्फूट फेसबूकला लिहील्यानंतर तसे ते दुरावलेही. पण त्यावरुन त्यांनी संवाद संपवला नाही. माझ्या या भूमिकेची कारणमिमांसा त्यांनी विचारली. याविषयावर दोनदा बोललो. पण त्यानंतर त्यांचा माझा संवाद झाला नाही. माझे आणि त्यांचे कामाचे प्रांत निराळे असल्याने दररोजच्या संपर्काची शक्यताही तशी कमीच होती. 

सतत कामात असणाऱ्या या माणसाची हेवा  वाटावा अशा लोकांशी मैत्री होती. कामाची तडफ तर अफाट. कामाची पध्दत पुणेरीच असावी असे काही नाही. विद्रोह  हा नेहमी आडदांड बेशिस्त असतो. बरंच काही उद्ध्वस्त करत तो अवतरतो. त्या अर्थाने सलिमभाई माझ्यासाठी विद्रोही होते.

साहित्याची भाषा अवगत नसली तर माणसानं लिहूच नये, असं काही नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘अंतःकरणाला पडलेली पिळ, वेदनांना जेव्हा शब्दरुप येतं. तेव्हा त्याला कशाचंही सोयरसुतक नसतं.’ सलीमभाईंनाही ते नव्हतं. थोडं बहुत काम करुन नाकावर अहंकार मिरवणाऱ्यांसाठी सलीमसारखा माणूस साधेपणाने संवाद साधून थोबाडीत मारायचा. अशा फाटक्या, इमानानं नेटक्या  असणाऱ्या, फकिरी पत्करुन काम उभा करु शकणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांची गरज नेहमीच समाजाला भासणार आहे. त्यात त्यांचं जाणं बोचणारं ठरतंय.

मला त्यांच्या कामाची पध्दत इतर धर्मप्रचारकांसारखी वाटली नाही.  ते इस्लाम जगत होते. त्यांनी स्वतःच्या मुलासाठी अनाथाश्रमातील मुलगी सुन म्हणून निवडली. मुलीलाही असाच साधा नाहीरे वर्गातला मुलगा जोडीदार म्हणून निवडला. जावयालाही चळवळीच्या कामाला जुंपले. दुसरी मुलगीही त्यांच्या चळवळीतल्या कामाची सोबती होती. हा माणूस कुटुंबाच्या पातळीवर पुर्णतः फकीर होता. चळवळीतल्या कामांसाठी मात्र स्वतःला झोकून द्यायचा.  हे सर्व करत असताना या माणसाने कुटुंबला वेळही दिला नाही, त्याला उभे करण्यासाठी, आपल्या पश्चात आधार म्हणून चार पैसेही  मागे ठेवले नाहीत. समाजाने आता या माणसाच्या कुटुंबीयांच्या मागे उभे राहायला हवे. बघा काही करता आलं तर….


सलीमभाईंच्या इमानदारीला, समर्पणाला  सलाम.  


सरफराज अहमद

सोलापूर

Post a comment

0 Comments