विनाकारण अडवून त्रास देणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता कडक कारवाई. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते . नाकाबंदी अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर केसेस करण्यापूर्वी त्याची सर्वप्रथम नोंद पोलीस ठाण्याच्या दैनंदिनीत करून कंट्रोल रुमलाही कळविणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले. परराज्यांतील तथा परजिह्यांतील वाहनांना विनाकारण अडवून त्रास देणाऱ्या वाहतूक  पोलिसांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

महामार्ग असो वा राज्य मार्गांवर नाकाबंदी करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱयांसह पोलीस मुख्यालयास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. नाकाबंदी सुरू असताना डमी वाहनचालक पाठवून पोलीस उपअधीक्षकांनी कार्यवाहीची पडताळणी केली जाणार आहे.दरम्यान, ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन वेडेवाकडे चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट अथवा नंबर प्लेटच नाही, अशा नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनांवर निश्चितपणे कारवाई करावी. ते नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे डोळ्यांनी स्पष्टपणे दिसते. मात्र, दुसऱया वाहनांना अडविताना कंट्रोलची परवानगी घ्यावीच लागेल, असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. विनाकारण वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. काही ठिकाणी गैरप्रकाराच्या तक्रारीही ऐकू येतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये, यादृष्टीने सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दशविधी, लग्न, वारकरी दिंडी, धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱया वाहनांना विनाकारण अडवून त्रास देऊ नये. वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी संशयास्पद वाटणारी तथा नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनांवर निश्चितपणे कारवाई करावी. विनाकारण त्रास देणाऱयांबद्दल तक्रार प्राप्त झाली आणि त्यात तथ्य असल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments