महाराष्ट्रात आम्ही सुखी आहोत मराठी भाषिकांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार करु नका, असा घरचा आहेर महाराष्ट्रात वर्षानुवर्षे रोजगार, व्यवसाय करणाऱ्या कन्नड बांधवांनी खुद्द कर्नाटक सरकारला आज आवाहनातून दिला



महाराष्ट्रात आम्ही सुखी आहोत. येथे कसलाही त्रास नाही.पण सीमाभागात मराठी भाषिकांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार करु नका, असा घरचा आहेर महाराष्ट्रात वर्षानुवर्षे रोजगार, व्यवसाय करणाऱ्या कन्नड बांधवांनी खुद्द कर्नाटक सरकारला आज आवाहनातून दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यात शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कन्नड व्यवसायिकांनी केवळ आज एक दिवस आपापले व्यवहार बंद ठेवून, मराठी भाषिकांना पाठिंबा दिला. तर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी कर्नाटक सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली.

कन्नड रक्षण वेदिकेच्या (करवे)च्या मुठभर गुंडांनी बेळगांव महानगरपालिकेसमोर फडकविलेला बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज अजुनही हटविला नाही.तसेच सीमाभागात शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ले करुन, कार्यालय बंद करण्यासाठी दडपशाही सुरू आहे. अजुनही अशा हल्लेखोरांवर कसलीच कारवाई केली नाही .त्यामुळे कर्नाटक सरकारच्या आशीर्वादानेच मराठी भाषिक आणि तरुणांना लक्ष करण्यात येत असल्याने, या दडपशाही विरोधात शिवसेनेकडून पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व कानडी व्यवसाय शनिवार 20 मार्च रोजी बंद करण्याचे आवाहन केले होते. आंदोलनाला कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिला आहे. त्यात महाराष्ट्रातील वाहनांना कर्नाटकात नो एंट्री ‌पण कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात खुलेआम फिरत असल्याने, शुक्रवारी सायंकाळी पुणें-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उचगाव येथे कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर जय महाराष्ट्र लिहून कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला. तर शनिवारी सकाळी प. महाराष्ट्रातील कन्नड व्यवसाय बंद करुन, ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी बेळगांव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देेत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. यावेळी सुजित चव्हाण,अवधुत साळोखे,राजू यादव, शशिकांत बिडकर, विनोद खोत, हर्षल सुर्वे, मंजित माने, भाग्यश्री देशपांडे, दीपाली शिंदे, कमल पाटील, स्मिता सावंत, शुभांगी पोवार, गीतांलजी गायकवाड, पुजा शिंदे आदी उपस्थित होते.

मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा, अन्यथा महाराष्ट्रातील कानडी मजुरांना पळवून लावू - करवीर शिवसेना

रेल्वे गुड्स, मार्केट यार्ड येथे 700 ते 800 मजुरांपैकी अर्ध्याहून जास्त कानडी मजूर आहेत. त्यांना येथे कोणताही त्रास नाही.जर कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्रात रोजगार, व्यवसाय करणाऱ्यांना सळो की पळो करु असा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला.

यावेळी महाराष्ट्रात काम करत असलेल्या कानडी मजुरांपैकी सुभाष कामनगिरी यांनी आम्ही महाराष्ट्रात आजपर्यंत सुरक्षित होतो, यापुढेही सुरक्षित राहणार असा विश्वास व्यक्त करत कर्नाटक सरकारला सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवावेत अशी विनंती केली व शेवटी सर्व कानडी भाषिकांनी 'जय हिंद' 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा दिल्या. तसेच रेल्वे गुड्स मार्केट यार्ड येथील सर्व हमाल बंधूनी कर्नाटक सरकारच्या विरोधात निदर्शने करत करवीर शिवसेनेच्या आंदोलनात सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post